गुरुवर्य सप्तरंगी परिपाठ

🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷
------------------------------------------ 
  🎄 *आजचा परिपाठ🎄
-----------------------------------------
         🔅 *पंचांग* 🔅
 तिथी - कार्तिक पंचमी
 पक्ष - कृष्ण 
 शके - १९४६
 नक्षत्र :  पुनर्वसु 
 सूर्योदय - ६ वा.४४ मि.
 सूर्यास्त - ५ वा.५३ मि.
 दिनांक - २० /११/२०२४
 वार - बुधवार 
 महिना : नोव्हेंबर
 ----------------------------------------
      🔅 *सुविचार* 🔅
जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास पात्र होतो.
 Who wakes to duty, He deserves praise.
------------------------------------------
       🔅 दिनविशेष 🔅 
२० नोव्हेंबर  महत्वाच्या घटना :
२००८: अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी
पातळीवर पोहोचला.
१९९९: अनाथ आणि निराधार बालकांच्या
संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट
पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.
१९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला
भाग प्रक्षेपित.
२० नोव्हेंबर जन्मदिन : 
 १९३९: वसंत पोतदार - साहित्यिक 
१९२७: चंद्रशेखर धर्माधिकारी - न्यायमूर्ती १९२४: बेनुवा मँडेलब्रॉट - फ्रेंच गणितज्ञ
१९१०: विलेम जेकब व्हान स्टॉकम - डच
भौतिकशास्त्र
१९०६: कॅरोलिन मिकेलसेन - डॅनिश-नॉर्वेजियन एक्सप्लोरर, अंटार्क्टिकामध्ये पाऊल ठेवणाऱ्या
पहिल्या महिला 
१९०५: मिनू मसानी - अर्थतज्ञ 
१८९२: जेम्स कॉलिप - इंसुलिनचे ससंशोधक
१८८९: एडविन हबल - अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ
१८५४: मोरो गणेश लोंढे - कवी, निबंधकार व
नाटकाकर
२० नोव्हेंबर निधन :
 १९९७: आचार्य बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी
१९८९: हिराबाई बडोदेकर - किराणा घराण्याच्या
प्रसिद्ध गायिका 
१९७३: प्रबोधनकार ठाकरे - भारतीय पत्रकार व
समाजसुधारक 
१९७०: यशवंत खुशाल देशपांडे - महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक 
१९५४: क्लाईड व्हर्नन सेसेना - सेसेना
एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक 
१९१०: लिओ टॉलस्टॉय - रशियन लेखक 
१९०८: कन्हय्यालाल दत्त - क्रांतिकारक
१८५९: माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन - स्कॉटिश
मुत्सद्दी, मुंबई प्रांताचे गवर्नर 
-----------------------------------------
       🔅 *बातम्या* 🔅
 स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती

नक्षत्रांचे देणे फेम गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन

पैशांचं बंडल सापडल्यानंतर ठाकूर पिता-पुत्र आणि तावडेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली

निवडणुकीतील भाजपचा खेळ संपला…नालासोपरातील प्रकरणानंतर संजय राऊत यांचा हल्ला

व्होट जिहादवरून राज्यातील निवडणुकीचं वातावरण तापलं, आरोपप्रत्यारोपाच्या फैरी
-----------------------------------------
  🎄 **व्यक्तीविशेष* 🎄
      🔅चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी 🔅
   मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म रायपूर येथे वकिलीची परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी हे न्या. धर्माधिकारी यांचे वडील होत.
      न्या.धर्माधिकारी यांचे शालेय शिक्षण वर्धा येथील नवभारत विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपूरचे एस.बी.सिटी कॉलेज आणि नोशेर महाविद्यालय येथे झाले. १९४९मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. नंतर नागपूर विद्यापीठातून १९५२मध्ये एम.ए. आणि विद्यापीठ कायदा महाविद्यालयातून १९५४मध्ये एलएल.बी.या पदव्या त्यांनी संपादन केल्या. दोन वर्षे जिल्हा न्यायालयात वकिली केल्यानंतर दि.२५ ऑक्टोबर १९५६ रोजी ते तेव्हाच्या नागपूर उच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. दि.२१ जुलै १९५८ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात आणि दि.२० जुलै १९५९ रोजी सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले.
ऑगस्ट १९६५मध्ये धर्माधिकारी यांची नागपूर येथे सहायक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. नंतर ऑक्टोबर १९७०मध्ये त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाचे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून झाली. १३जुलै१९७२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २४नोव्हेंबर१९७२ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. १९नोव्हेंबर१९८९ रोजी ते पदावरून निवृत्त झाले.
     उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीत न्या.धर्माधिकारी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. यामध्ये आणीबाणी लागू असतानाच्या काळातील नागरिकांचा जगण्याचा हक्क, स्त्रियांचे हक्क, मनोरुग्णांचे, कैद्यांचे व आदिवासी मुलांचे हक्क इ. विविध प्रश्नांवरील किंवा मुद्द्यांवरील निकालांचा उल्लेख करता येईल.
      त्यांच्यासमोर त्या वेळी अतिशय गाजलेले आणि महत्त्वाचे दोन फौजदारी खटलेही आले. त्यातील पहिला खटला म्हणजे पुण्याचे जोशी-अभ्यंकर हत्याकांड. या हत्याकांडातील आरोपींना पुण्याच्या सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध त्यांनी केलेले अपील न्या.धर्माधिकारी आणि न्या.विजय कोतवाल यांच्या खंडपीठासमोर चालले. न्यायमूर्तींनी फाशीची शिक्षा कायम केली आणि नंतर ती सर्वोच्च न्यायालयानेही कायम केली. या आरोपींनी राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्जही फेटाळला गेला. दुसरा खटला म्हणजे चंद्रकला लोटलीकर खून खटला. यात रत्नागिरीच्या सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सरकारने केलेले अपील न्या. धर्माधिकारी आणि न्या. अगरवाल यांनी मंजूर केले आणि आरोपींना शिक्षा दिली.
      न्या.धर्माधिकारी यांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले.
       मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर न्या.धर्माधिकारी यांचे प्रभुत्व होते. या तिन्ही भाषांतील त्यांचे वक्तृत्व सारखेच प्रभावी होते आणि तिन्ही भाषांत त्यांनी घटना व कायदा आणि त्याशिवाय अन्य विविध विषयांवर सोळा पुस्तके आणि अनेक लेख लिहिले आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना पद्मभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले . न्यायाधीश होण्यापूर्वीच्या काळात त्यांचा नागपुरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निकटचा संबंध होता. त्या काळात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. आजही तीसहून अधिक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विशेषत: गांधीवादी संस्थांशी त्यांचा, पदाधिकारी, विश्वस्त किंवा सदस्य या नात्याने संबंध आहे. शेवटच्या काळात त्यांचे वास्तव्य मुंबईला होते.
---------------------------------------
   🎄 *सामान्यज्ञान* 🎄
      आयुर्वेदिक वनस्पती 
         🔅घायपात 🔅  
शेतजमिनीच्या बांधावर लागवड केली जाणारी घायपात वनस्पती घायाळ म्हणूनही ओळखली जाते. ही अगेव्हसी कुलातील अगेव्ह प्रजाती असून तिच्या अनेक जाती आढळून येतात. ही वनस्पती मूळची मेक्सिकोतील तसेच अमेरिकेच्या दक्षिणेकडील संयुक्त संस्थानांतील असून तिचा प्रसार दक्षिण यूरोप, आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत, श्रीलंका या देशांत झाला आहे. पंधराव्या शतकात पोर्तुगीज लोकांनी ही वनस्पती भारतात आणली. भारतात हिची लागवड कर्नाटक, तमिळनाडू, केरळ व महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणावर केली जाते.घायपात या एकदलिकित बहुवर्षायू वनस्पतीचे खोड लघुस्तंभीय, अर्धकाष्ठमय असून जमिनीवरील खोडाचा भाग पानांच्या वर्तुळाकार गुच्छाने वेढलेला असतो. पाने साधी, लांब, मांसल, टोकदार, बिनदेठाची, चिवट व मेणचट असतात. त्यांचा रंग करडा हिरवा असून दोन्ही कडांवर व टोकांवर तीक्ष्ण व लहान काटे असतात. या वनस्पतीला प्रादेशिक हवामानानुसार दहा ते साठ वर्षांदरम्यान एकदाच फुलोरा येतो. फुलोऱ्याचा दांडा तळाशी सु.१५ सेंमी. जाड असून ६ – १० मी. उंच असतो. तो खोडाच्या मध्यातून येतो.
फुले पांढरी, झुपक्या-झुपक्यांनी येतात. फळात अनेक बिया असतात. बिया चपट्या, काळ्या व पातळ असतात. फुलोरा येऊन गेल्यावर झाड मरते. फुलोऱ्यातील लहान कंदिकांपासून तसेच मूलक्षोडापासून येणाऱ्या अधश्चरांपासून नवीन वनस्पती तयार होतात.
घायपाताची मोठी पाने पोटिसासाठी वापरतात. पानांचा रस सारक, आर्तवजनक व रक्तपित्तनाशक आहे. मुळे स्वेदकारी व गरमीनाशक आहेत. दांड्यातील रसापासून साखर व शिर्का तयार करतात. रस्त्याच्या व लोहमार्गाच्या दुतर्फा, कुंपणासाठी तसेच उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी ही वनस्पती लावतात. तिच्या पानांपासून उपयुक्त धागा (वाख) मिळतो. तो लांब, मजबूत व भरभरीत असून दोर व दोरखंड करण्यासाठी वापरतात. याखेरीज चटया, पायपुसणे, गालिचे, जाडेभरडे कापड, स्वस्त प्रतीचे ब्रश व खुर्चांच्या गाद्या तयार करण्यासाठी वाख वापरला जातो.
----------------------------------------
      🔅 *वाक्प्रचार* 🔅
 आळ घेणे - आरोप करणे , ठपका ठेवणे
----------------------------------------
         🔅 *म्हण* 🔅
 गरज सरो , वैद्य मरो - आपले काम संपताच उपकार कर्त्याला विसरणे
-----------------------------------------
       🔅इंग्रजी प्रश्न 🔅
1) Name the National river of India?
Ans. Ganga
2)Name the National Reptile of India?
Ans. King Cobra
3) What is the capital of India?
Ans. New Delhi
4)Name the biggest continent
in the world?
Ans. Asia
5) How many continents are there in the world?
Ans. 7 continents
------------------------------------------
       🎄 *प्रार्थना*🎄
🔅नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा 🔅
 नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ. ॥

शब्दरूप शक्ति दे, भावरूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा, चिमणपाखरा ज्ञान मंदिरा ... सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ।।१॥

विद्याधन दे आम्हांस, एक छंद एक ध्यास नाव नेई पैलतीरी दयासागरा, दयासागरा ज्ञान मंदिरा ... सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ॥२॥

होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धीमंत कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा ज्ञान मंदिरा ... सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ॥३॥
-----------------------------------------
      🔅मनाचे श्लोक 🔅
सदा सर्वदा देव सन्नीध आहे।
कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥

मना प्रार्थना तूजला एक आहे।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।
जयाचेनि योगें समाधान बाणे॥
तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे।
अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥
विविकें कुडी कल्पना पालटिजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥
------------------------------------------
     🎄 बडबडगीत 🌲 
 🔅नाच रे मोरा🔅
 नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !

ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
------------------------------------------
         🌲समूहगीत🌲 
🔅बलसागर भारत होवो      🔅
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
 
कवी : साने गुरुजी
-----------------------------------
      🌲 *बोधकथा*🌲  
 🔅ससा आणि कासव 🔅 
एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल. ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.
ठरल्या प्रमाणे दुसर्या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” ्जोपर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.
कासव हळूहळू चालत ससापर्यंत आले व कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली. ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससा च्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.
तात्पर्य :  कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.
------------------------------------------
       🔅 प्रश्नमंजुषा 🔅
१) वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर: कार्बन डायऑक्साईड
२) कोणाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?
उत्तर: लोह
३) पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी काय वापरण्यात येते ?
उत्तर : क्लोरीन
४)कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास
रात अंधाळेपणा हा रोग होतो ?
उत्तर: 'अ' जीवनसत्व
५) त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे
प्राप्त होतो?
उत्तर : मेलानिन
🔸🔸  🔸🔸🔸🔸🔸🔸
---------------------------------------

42 comments:

  1. एक परिपूर्ण ब्लॉग ...👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर व परिपूर्ण रचना केलेली आहे. अभिनंदन भागवत सर.💐💐👌👌💐💐👌👌

    ReplyDelete
  3. खूप छान सर 👌👌

    ReplyDelete
  4. दैनंदिन परिपाठ उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भावी आयुष्यातील वाटचालीस नकळत संस्कार प्रदान करत असते,आणि एक सज्जन नागरिक तयार होण्यास याच संस्कारांची अत्यन्त गरज आहे, आणि तेच संस्कार परिपाठ या माध्यमातून आपण देत असतो, तुमचे दैनंदिन परिपाठ आम्हाला खूप उपयुक्त ठरते, thanks bhagwat sir,

    ReplyDelete
  5. आपला परीपाठ इंग्रजी मधून मीळतो का ?

    ReplyDelete
  6. खूप खूप छान माहिती असते...

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर परिपाठ,,,

    ReplyDelete
  8. खूपच छान दैनिक परिपाठ रचना आहे. प्रत्येक घटकाचा अंतर्भाव आहे.

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर व परिपूर्ण रचना केलेली आहे. अभिनंदन भागवत सर.💐💐👌👌💐💐👌👌

    ReplyDelete
  10. खुप छान सर

    ReplyDelete
  11. अतिशय परिपूर्ण असा दैनिक परिपाठ असतो. द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. एक विनंतीवजा सूचना करावीशी वाटते- सुविचार आणि सामान्य ज्ञान प्रश्न यांमध्ये पुनरावृत्ती होऊ नये.

    ReplyDelete
  12. Thank sirji 🙏गुरुवर्य सप्तरंगी परिपाठ शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. आपण आपल्या पद्धतीने, कल्पकतेने त्यात बदल करून शाळेत परिपाठ घ्यावा.

    ReplyDelete
  13. कृपया सुविचार व सामान्य ज्ञान मधील प्रश्न सतत तेच तेच येत आहेत, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, ही अपेक्षा!

    ReplyDelete
  14. खूप छान आहे

    ReplyDelete
  15. अतिशय सविस्तर व उपयुक्त परिपाठ

    ReplyDelete
  16. अतिशय सुंदर

    ReplyDelete