Thursday, 5 September 2024

शिक्षणात परिवर्तनाची गरज

  


शिक्षणात परिवर्तनाची गरज


डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी  दक्षिण भारतातील तिरूत्तनी येथे झाला.त्यांचा  जन्मदिवस देशभर शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांप्रती आदराची भावना आपण व्यक्त करतो.गुरूप्रती असलेली शिष्याचे नाते अतूट असते.निरागस प्रेम,आपुलकीची ओढ शिष्याच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले असते.जनमाणसात पूर्वीच्या काळी शिक्षकांना मोठा मान होता.गावात शिक्षकाचा शब्द अंतिम असायचा.गावात लग्न असले तरी शिक्षकांना निमंत्रण असायचे.धार्मिक कार्यक्रम असला नियोजनात शिक्षक असायचे गावातून शिक्षक जात असतांना लोक वाकून नमस्कार करायचे. गुरूंविषयी आदर,आपुलकी,प्रेमाची भावना त्यामागे होती

गावात पोस्टमन पत्र घेऊन आला तरी बायाबापडे ते वाचण्यासाठी गुरूजींकडे घेऊन जायचे.परिस्थिती बदलली परंतू गुरूशिष्याचे नाते अजूनही टिकून आहे जनमाणसात परिस्थितीतीत आज बदल झालेला दिसून येतो.गावात लग्न होतात विविध कार्यक्रम होतात. पण गुरूजींना साध निमंत्रण देण्याची तसदी कोणी घेतांना दिसत नाही.याउलट गुरूजी समोरून जातांना दिसले तर दुसरीकडे तोंड फिरते.आज गुरूजी पालक ग्रामस्थांना नमस्कार करतो.पण त्यांच्याकडे बघण्याचे काम पालक ग्रामस्थ करतांना दिसत नाही. असे का झाले असेल याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आज जनमानसावर आली आहे. गुरुजी सर कसे झाले कळले नाही.पायी किंवा सायकलने जाणारे शिक्षक मोटारसायकल ते थेट मोटारगाडीने  शाळेत जाऊ लागले. हा प्रवास  थक्क करणारा होता.सरांची आर्थिक परिस्थिती , राहणीमान सुधारले परंतू विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकीची भावना तशीच आहे. शिष्याच्या झोळीत विद्यारूपी दान टाकणे कमी झाले नाही. दातृत्वाची भावना आजही तशीच आहे. काही याला अपवाद असतीलही पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची किमया शिक्षक साधू शकतो यात मात्र शंका नाही.जनमानसावर याचा आता निश्चितच परिणाम होत आहे.मराठी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे.सरांशी जवळीक पालकांची, ग्रामस्थांची वाढली आहे.शाळांनी कात टाकली आहे. रंगीबेरंगी रंगात शाळा सजू लागल्या आहेत. पण अशैक्षणिक कामांची याला दृष्ट लागली.आज सर निवडणुकीची कामे,साक्षरतेची कामे , विविध प्रकारचे सर्वे,ऑनलाईन कामे यात गुंतले आहेत.उपक्रमांचा भडीमार चालू आहे.उपक्रम घ्या , फाईल ठेवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा फोटो काढा, अपलोड करा त्वरीत माहिती भरा , ताबडतोब पाठवा ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पध्दतीचा वारेमाप वापर सुरू आहे.बिचारे विद्यार्थी हे सर्व पाहत आहेत. सर आम्हांला शिकवा ही आर्त हाक लवकरच ऐकायला मिळाली तर नवल वाटायला नको.

अध्ययन व अध्यापन या दोन बाबींमध्ये अंतर पडत आहे. हे जर कुठेतरी थांबवायचे असेल मराठी शाळा वाचवायच्या असतील तर पालक,प्रशासन , शिक्षक   एकत्र आले पाहिजे यावर चिंतन अपेक्षित आहे.हा त्रिकोण जो पर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील.शिक्षण सुरू राहील पण त्यामध्ये रस राहणार नाही.परिवर्तनाच्या दिशेने आता वाटचाल करायला हवी.शिक्षक राष्ट्राचे शिल्पकार आहे.तर विद्यार्थी राष्ट्राची संपत्ती आहे.शिक्षणात ज्ञान,मान,पैसा,पायाभूत आधुनिक सुविधा यांची गुंतवणूक झाली तर नक्कीच भारत देश प्रगतीपथावर असेल.एक शिक्षक राष्ट्रपती पदावर पोहचू शकतो.देशाचा कारभार करू शकतो.शिक्षक  या शब्दात किती ताकद आहे.हे या निमित्ताने दिसून येते. या देशात अनेक शिक्षण महर्षी घडले . क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन सानेगुरूजी,शाहूमहाराज,मौलाना आझाद या सर्वांना आजच्या शिक्षकदिनी वंदन करतो.

शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

कैलास भागवत , संगमनेर

भ्रमणध्वनी : ९०११२२७५८६