अभ्यासाचा कंटाळा
विद्यार्थ्यांना शाळेत, घरी हल्ली अभ्यासाचा कंटाळा येतो. असे का बरे होते ? सर खेळायला सोडा अशी आर्जव मुले सायंकाळी चार वाजले की करतात.अध्यापनाची पध्दत, नीरस वातावरण, तोच तो अभ्यास यामुळेच शाळेत मुले कंटाळतात.
मुले नेहमी नावीन्याच्या शोधात असतात. त्यासाठी शिक्षक , पालकांनी मुलांचा कल, आवड याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे .
शाळेत सकाळी जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा ते खूप आनंदी असतात.आपले मित्र, वर्गशिक्षक यांची भेट होणार असते. अशा मुलांचे निरीक्षण शिक्षकांनी करायला हवे शिक्षकांची गाडी आली की मुले आनंदाने धावतपळत शिक्षकांजवळ येतात. Good morning sir म्हणतात येथूनच संवादाला सुरूवात होते. आपण ही लगेच म्हटले पाहिजे Good morning children मुलांशी मराठी , इंग्रजीतून किंवा त्यांच्या बोलीभाषेतून संवाद साधला तर मुलांना छान वाटते ते खूप बोलतात. दिवसाची छान सुरूवात होते. पण आपण संवाद साधला नाही निरुत्साह दाखवला. चेहऱ्यावर हास्य दाखविले नाही.तर मुले नाराज होतात.सर आपल्याबरोबर आज बोललेच नाही अशी आपसात चर्चा करतात.
परिपाठात दररोज मुलांना भरपूर संधी द्यायला हवी, गोष्ट, सुविचार , पाढे, इंग्रजी , मराठी प्रश्न , प्रार्थना, समूहगीत गायन मुले आनंदाने परिपाठात रममाण होतील.आनंददायी वातावरणात परिपाठ झाला तर मुले नवीन शिकतील, चैत्रात जशी झाडांना पालवी फुटते तशी मुलांना नव चैतन्याची पालवी फुटते त्यांना ज्ञानाचे घुमारे फुटतात.
वर्गात जेव्हा मुले प्रवेश करतात तेव्हा मुलांमध्ये भीतीचे वातावरण नसावे नाही तर अध्यापन कंटाळवाणे होईल मुले हसत खेळत आनंददायी वातावरणात शिकले पाहिजे यासाठी गोष्ट,गाणी, कविता, विनोद ,छोटे छोटे खेळ अधूनमधून वर्गात घेतले पाहिजे त्यांना खेळाच्या मैदानावर घेऊन गेले पाहिजे . नाविन्यपूर्ण खेळ ,मनोरंजक खेळ,मैदानी खेळ घ्यायला हवेत असे खेळातून शिक्षणाकडे मुलांना घेऊन जाता येईल.असे नियोजन दिवसभरात झाले तर मुलांना अभ्यासाचा अजिबात कंटाळा येणार नाही. अध्ययन सुलभ होईल मुलांचा दिवस आनंदात जाणार शाळा सुटण्याची सायंकाळी बेल झाल्यावर मुले आनंदाने घरी जायला निघतात.धावत पळत घरी पोहचतात.व तेथून पुढे पालकांची जबाबदारी सुरू होते. पालकांनी मुलांना जा रे दप्तर व्यवस्थित ठेव हात पाय स्वच्छ धुवून घे . काहीतरी खा.असे म्हटले पाहिजे. जवळ बस. मुलांची विचारपूस करायला हवी. मग आजचा शाळेचा दिवस कसा गेला. सरांनी काय शिकविले, अभ्यास काय दिला ? तुला शाळा आवडते का? मुले भरभरून शाळेविषयी ,अभ्यासाविषयी सांगतात.मुलांशी दमदाटीने बोललात, वागलात तुला काहीच येत नाही तू 'ढ' आहेस तुझ्या सरांनी तुला काही शिकविले नाही का? असे जर मुलांशी उद्धटपणे जर पालक मुलांशी वागले तर मुले बुजरी, घाबरट होतील. अभ्यास करण्याचा कंटाळा करतील. पालकांच्या धाकाने अभ्यासावर परिणाम होईल म्हणून मुलांच्या कलाने, आवडीने घ्यायला हवे, खेळायला जा तेथून आल्यावर अभ्यास कर , वाचन कर . मोकळे वातावरण असेल तर मुलांना अभ्यासाचा कंटाळा येणार नाही .त्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त घरात एका कोपर्यात मुलांसाठी छोटेसे ग्रंथालय असावे आपण मुलांसमोर वाचायला बसले की मुलेही पुस्तक वाचतील पालक मुलांसमोर टि.व्ही पाहत असतील तर मुलेही पाहतील मुले शिक्षकांचे,पालकांचे अनुकरण करत असतात. म्हणून आपण मुलांसमोर वावरतांना आरशासारखे स्वच्छ, निर्मळ , सृजनशील, आनंदी राहायला हवे . असे आनंददायी वातावरण शाळेत व घरी असेल तर मुलांना अभ्यासाचा कंटाळाच येणार नाही.मुले आनंदाने अभ्यास करतील.
बांधून तोरण आनंदाचे
दिन हा साजरा व्हावा
मुलांचा जीव इथे रमावा
कंटाळा कधी ना यावा .
हसत खेळत, नाचून बागडावे
पाढे म्हणावे ,भाषण करावे.
आनंदाने कविता, गाणी गावे
आनंदाच्या गावाला खुशाल जावे.
- कैलास भागवत (प्राथमिक शिक्षक)
जि.प.प्राथ.शाळाआंबीखालसा ता. संगमनेर
जि.अ.नगर
गुरुवर्य : https://guruvary.blogspot.in