Thursday, 29 June 2023

माझा ब्लॉग माझा विचार - शिक्षणाची वारी

 


शिक्षणाची वारी

-----------------------------------

" नाही झाले पंढरीशी कधी जाणे

मुलांसाठी काहीच ठेवणार नाही उणे "

 शाळा हीच आमची पंढरी , विद्यार्थी हेच माझे दैवत " 

दरवर्षी जून महिन्यात पंढरीची वारी सुरू होते.संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई,संत सोपानदेव इत्यादी अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरकडे  विठू माऊली च्या दर्शनासाठी रवाना होतात. हरिनामाचा जयघोष करत असंख्य वारकर्‍यांचे पाऊले पंढरीच्या दिशेने वळू लागतात.अगदी त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांची पाऊले जूनमध्ये सुट्टी संपल्यानंतर शाळेकडे अर्थात ज्ञानमंदिराकडे वळू लागतात."शाळा हीच पंढरी व शिक्षक हेच विठू माऊली "ही भावना मुलांच्या निरागस चेह-यावर दिसते.शिक्षकांप्रती असलेली आपुलकी मनात कायम घर करून बसलेली असते.आणि शिक्षक सुध्दा या ज्ञानरूपी निरागस, लोभस,अजान वारक-यांमध्ये विठ्ठलाला शोधत असतो.

मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम कुंभार करीत असतो.मातीला एकजीव करत असतांना तो तल्लीन होऊन जातो.परमेश्वराच्या चरणी लीन होतो.कामात परमेश्वर पाहतो.अगदी त्याप्रमाणेच शिक्षक आपल्या अध्यापनात लीन होतो.घरादाराची आठवण त्याला येत नाही. एवढं तादात्म्य, विषयरूप होऊन जातो, तो आमचा गुरूजन. भजनात,हरिपाठात जसे वारकरी तल्लीन होऊन नाचतात तसाच आमचा शिक्षक कविता,गाण्यात तल्लीन होऊन मुलांसोबत एकरूप होऊन भान हरपून नाचत असतो. वारकरी दिवसभर भजन हरिपाठात रमून जातो. रात्री पालखी तळावर भोजन झाल्यावर कसलीही काळजी चिंता मनात येत नाही. रात्री निवांत झोपी जातो. तसेच दिवसभर  शिक्षक मुलांमध्ये समरस होतो,अध्यापन करतो.कृतीतून धडे कविता , बालगीते,गाणी शिकवतो.नाट्य,नृत्य शिकवतो.जेव्हा घरी येतो तेव्हा आत्मिक समाधानाची लाली त्याच्या चेहर्‍यावर उजळलेली असते. घरातील मुलाबाळांसोबत जेवण करतो.समरस होतो.रात्री समाधानाने झोपी जातो.

आषाढीच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिंड्या पंढरीकडे वाटचाल करीत असतात.शिक्षणाच्या वारीतही शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापासून दिंडी सुरू होते.विविध शालेय महोत्सव,जयंत्या , वृक्षलागवड,स्वच्छता अशा विविध विषयांवर वर्षभर दिंड्या काढल्या जातात. शिक्षणाचे वारकरी,धारकरी अगदी तनमनधनाने यात सहभागी होतात.पंढरीच्या वारीचे मुख्य आकर्षण म्हणजे गोल रिंगण हे रिंगण पार पडत असतांना माऊलीचा अश्व रिंगणात गोल फेरी मारतो. त्यावेळेस अश्व गेल्यानंतर वारकरी माती श्रध्देने कपाळाला लावतात.माऊलीचा विठुरायाचा जयघोष करतात. मराठी शाळांमध्ये उपक्रमांचे रिंगण,परिपाठ, श्लोक, पसायदान, विविध मनोरंजक खेळ,मैदानी खेळ वर्षभर चालू असतात. मैदानावरील मातीने शाळेतील हे शिक्षणाचे वारकरी कधी माखतात हे कळून सुध्दा येत नाही.एवढे मातीशी एकरूप होतात.शिक्षणातील पांडुरंग माझा शिक्षक हे सगळं तन्मयतेने, कुतूहलतेने पाहत असतो.शिष्याची प्रगती पाहत असतांना तो मनातून नक्कीच सुखावतो.

पंढरीच्या वारीत सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने सहभागी होतात.जातीभेद नसतोच मुळी मुखात एकच नाम 'विठुमाऊली ' शिक्षणाच्या वारीत सर्व जातीधर्माचे विद्यार्थी,पालक, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी होतात.एकमेकांत मिसळून जातात. शाळेसाठी एकरूप होऊन जातात. विद्यार्थी हितासाठी झटत असतात. जिल्हा परिषदेची मराठी शाळा ही एकमेव शाळा ज्या शाळेत सर्वजातीधर्मातील मुलेमुली प्रवेश घेतात.एकमेकांवर जातीधर्माच्या भिंती ओलांडून निस्सीम बंधू,भगिनी प्रमाणे प्रेम करतात.सर्व जगताला सर्वधर्मसमभावाचा संदेश  जसा आमचा विठुराया देतो.तसाच आमचा शिक्षकही हा संदेश मुलांमध्ये रुजवतो, सर्वदूर पोहचवतो.

पंढरीचा पांडुरंग संताना  आपल्या कडेवर ,अंगाखांद्यावर घेतो. त्यांचे कोडकौतुक करतो.

तसाच आमचा शिक्षक मुलांचे लाड करतो.मुलांच्या आरोग्याची काळजी घेतो.लहान मुलांचे डोळे पुसतो त्यांना कडेवर घेतो.त्यांना खाऊ देतो.गाणे, कविता म्हणतो.त्यांच्या सुख दु:खात सहभागी होतो.वारी अखंडपणे,अव्याहत सुरूच राहणार आहे.विठूमाऊलीचा जयघोष सुरूच राहणार आहे.संत ज्ञानेश्वर,संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत चोखामेळा आदी संताचा जयघोष ,नाव वर्षानुवर्ष दिंडीच्या माध्यमातून वारीत घुमणार. 

शिक्षणाची वारीही वर्षानुवर्ष अव्याहतपणे सुरू आहे.उपक्रमांचे रिंगण फिरत आहे.शैक्षणिक दिंड्या अविरत चालूच आहे.सर्वधर्मसमभावाचा संदेश सर्वदूर जातो आहे. आम्ही एक आहोत.आमची पंढरी शाळा आहे.मुलांमध्ये आम्ही उद्याचे संत ,महंत, कीर्तनकार,शास्त्रज्ञ , डाॅक्टर,इंजिनिअर,गुरूजन 

प्रशासकीय अधिकारी , पदाधिकारी , आदर्श नागरिक,उद्योजक बघत आहोत.घडवत आहोत.शिक्षणाची वारी अखंडपणे,अव्याहतपणे सुरू राहील.आपणही या वारीत तनमनधनाने सहभागी होऊ , सहकार्याची भावना ठेवू , सकारात्मक राहू, गुरूजनांचा मान राखू , एकजुटीने शाळेच्या विकासासाठी,विद्यार्थ्यांसाठी झटू या "आपली शाळा, मराठी शाळा " हा संदेश दूरवर पोहोचवूया 


राम कृष्ण हरी 🙏

आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


 - कैलास भागवत , संगमनेर 

9011227586

Monday, 12 June 2023

माझा ब्लॉग माझे विचार - शाळेतील पहिले पाऊल





                                          शाळेतील पहिले पाऊल 


मुलांची पहिली शिक्षिका 'आई ' असते.आई व मुलाचे नाते नाजूक असते.स्वतःला विसरून मुलांना घडविणारी आई असते.मूलाच्या जन्मापासून आई मुलाला घडवित असते. 

तसेच घरातील वडील,आजी ,आजोबा यांचेही संस्कार मुलांवर होत असतात.हसणं,रडण,

रागावणं,रुसणे अशा चेह-यावरील हावभावातून मूल व्यक्त होत असते.हळूहळू आई, बाबा अशा नावाने ते हाका मारते नंतर इतर शब्द ऐकून बोलण्याचा मूल प्रयत्न करते.परिसरातूनही मूल शिकत असते.परिसरातून विविध शब्द त्याच्या कानावर पडत असतात त्या शब्दांचे उच्चार बालक करीत असते.घर,परिसरातील बोलली जाणारी बोलीभाषा ते शिकत असते.बोलण्याचा प्रयत्न करते.बालकाचे पालनपोषण,आहार याची काळजी आई करत असते.बाळाला काय आवडते, काय नावडते हे आई बघते. त्याप्रमाणे त्याला भरवण्याचा प्रयत्न करते.

 पूर्वप्राथमिक शाळा अर्थात अंगणवाडीत आईच्या पदराला धरून बालक जाते.तेथे खेळते,बागडते.गाणी ,गोष्टी ऐकते.जसजसे बालकाचे वय वाढत जाते.तसे ते चालते,बोलते स्वतः काम करण्याचा प्रयत्न करते.शाळेत जाण्याच्या वयाचे ते होते. बालकाचे सहा वर्ष पूर्ण झालेले असतात.मूलाचे पाल्य मुलांना कोणत्या शाळेत पाठवायचे,शाळा कशी आहे.शिक्षक कोणते आहेत. याविषयी शेजारीपाजारी,परिसरात,

नातलगात,गावात मित्रमंडळींबरोबर चर्चा करतात.आपल्या मुलाचे भविष्य उज्वल घडवावे ही त्यांची भावना असते.

प्राथमिक शाळेत मुलाचे पहिले पाऊल पडणार असते.केवढा आनंद आईला व घरादाराला झालेला असतो. शाळेविषयी मनात कुतूहल असते.आपल्या गावातील मराठी शाळा,"आपला अभिमान मराठी शाळा "ज्या शाळेत आपण शिकलो त्याच शाळेत आपले मुले शिकणार याचा मनस्वी आनंद पालकांना झालेला असतो.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

'आई' नंतर मूलांचा गुरू अर्थात 'शिक्षक 'असतो.शिक्षक चांगल्या राष्ट्राचा आदर्श निर्माता असतो.मातीच्या गोळ्याला  आकार देण्याचे काम जसा 'कुंभार 'मेहनतीने आपल्या कल्पक हाताने करतो.व छानसे मडके तयार करतो.अगदी त्याप्रमाणे शिक्षक मुलांना घडविण्याचे त्यांना संस्कारीत करण्याचे काम करतात.

सुट्टीनंतर शाळा सुरू होत आहेत.तोपर्यंत आपल्या मुलांना शाळेची सवय लागावी मुले शाळेत नवीन प्रवेशित होणार आहेत. नवीन शिक्षक,नवीन मित्र मुलांना मिळतील शाळेचे वेळापत्रक, जेवणाच्या वेळा याची सवय आतापासूनच पालकांनी मुलांना लावावी.तसेच आपली शाळा कशी असेल छान खेळण्यासाठी मैदान असेल का ? गाणे ,गप्पा , गोष्टी होतील का ? नाचायला,गाणे गायला  मिळेल का?अशी  उत्सुकता मुलांना असेल त्यासाठी पालकांनी मुलाला गावात जाऊन शाळा दाखवण्यास हरकत नाही.

लहान मुले हट्टी असतात मला हे पाहिजे ते नको असा घोषा लावतात जे योग्य असेल ते दिले पाहिजे परंतू एखादी वस्तू,पदार्थ नको हे सुध्दा त्यांच्या मनावर  बिंबवले पाहिजे मुलांना त्या वस्तूचे,पदार्थाचे फायदे,तोटे समजावून सांगणे गरजेचे असते.मुलांना नकार पचवता आला पाहिजे.

 "आरोग्य सुदृढ तर मन सुदृढ" मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाचा,पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे.तरच त्यांचे लक्ष  अभ्यासाकडे लागेल.

मुलांना जेवणाच्या डब्यात काय द्यावे हा विचार आईच्या  मनात येत असेल.हल्ली मुलांना बाहेरील खाऊ जास्त आवडतो.कुरकुरे,वेफर्स वडापाव, हे पदार्थ मुलांच्या डब्यात देऊ नका मुलांना पौष्टिक पदार्थ बनवून द्या.सुका मेवा व चपाती भाजी यांचा समावेश डब्यात करावा.घरी बनवलेला चुरमुरे चिवडा,खजूराचे लाडू , फुटाणे,गूळ शेंगदाणे,मनुके , नाचणीचे बिस्कीटे यापैकी दररोज कोणत्याही एकाचा पौष्टिक आहार म्हणून समावेश करावा.म्हणजे मुले बाहेरील पदार्थ खाणार नाहीत.पालेभाज्या, कडधान्ये,ज्वारीची भाकरी किंवा चपाती यांचा समावेश दुपारच्या जेवणात असावा.शाळेतील पूरक आहाराचा सुध्दा लाभ घ्यावा. आतापासूनच घरी मुलांना शाळेतील वेळापत्रका प्रमाणे सवय लावावी.लवकर उठणे, वेळेवर आवरणे ,जेवण करणे , वेळेत अभ्यास करणे , खेळणे , लवकर झोपणे असे नियोजन आताच करा.  शेजारील मुलांशी मैत्री करणे त्यांच्याकडून शाळेविषयी, शिक्षकांविषयी जाणून घेणे.हे सुध्दा खूप महत्वाचे असते.  

शाळेतील पहिल्या दिवशी शाळेसाठी आपल्या पाल्यासाठी वेळ द्या. शिक्षकांशी , वर्गशिक्षकाशी मुलामुलीं विषयी बोला.त्यांचे गुण , छंद , आवड सांगा.

शाळेतील पहिला दिवस नक्कीच आनंदात जाणार शाळेतील पहिले पाऊल सकारात्मक, आनंदी,उत्साही नक्की पडेल . शिक्षणाचा श्रीगणेशा होईल.

- कैलास भागवत, संगमनेर 9011227586

Sunday, 21 May 2023

माझा ब्लॉग माझे विचार - शाळा एक ज्ञानमंदिर

 

शाळा एक ज्ञानमंदिर 


"ही आवडते मज मनापासूनी शाळा | लाविते लळा ही, जसा माऊली बाळा "

प्र.के. अत्रे यांची छान अशी शाळेविषयी कविता आहे.माझ्या शाळेने मला घडविले ज्या ज्ञानमंदिरात मी अक्षरे गिरविले लिहायला वाचायला शिकलो.मूल्यशिक्षणाचे व स्वयंशिस्तीचे धडे मिळाले. ती माझी मराठी शाळा.

मराठी शाळा टिकल्या पाहिजे त्यांची भरभराट झाली पाहिजे.तिचे रूपडे पालटले पाहिजे ही आमची भूमिका असली पाहिजे.

 पूर्वीची दगडी भिंती व छत पत्र्याचे किंवा कौलाची असलेली टुमदार शाळेची इमारत गावाचे वैभव होते.या शाळांमध्ये थोर व्यक्ती,नेते , उच्चशिक्षित अधिकारी,पदाधिकारी,शेतकरी,मजूर तसेच सर्वसामान्य नोकरदार वर्ग घडला.शिक्षण स्वयंपूर्ण, शिस्तीचे होते.श्रमदानातून शिक्षण मिळत होते.शाळेसाठी गाव राबायचे. शाळेचे कोणतेही काम असो गावकरी एकत्र यायचे बांधकाम असो किंवा साफसफाई असो श्रमदानातून सर्व काही घडायचे. यासाठी कामाचा कोणताही मोबदला पैसे घेतले जात नव्हते.एवढी आत्मयीता शाळेविषयी लोकांना होती.गावातून जातांना पाहुण्यांना सहज माणसे सांगायचे" ही आमची शाळा" या शाळेतून शिकून आम्ही मोठे झालो. मला अमूक गुरूजी होते.गुरूजी कडक शिस्तीचे होते गुरूजी गावात समोरून येतांना दिसले की आम्ही घाबरून पळून जायचो.परंतू गुरूजी शाळेसाठी खूप राबायचे शाळेभोवती झाडे लावणे त्याला काटयांचे कुंपण करणे,मुलांकडून झाडांना पाणी घालून घेणे कधीतर स्वतः गुरूजी ओढ्यावर जाऊन झाडांसाठी पाणी आणायचे व झाडांना घालायचे झाडांची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घ्यायचे. पाढे पाठांतर करून घ्यायचे वाचन,लेखन,गणिती क्रिया घ्यायचे भाषण कसे करावे हे शिकवायचे ,गाणी ,कविता सूरात म्हणायचे  हे सर्व सांगतांना माणसांची छाती अभिमानाने फुलून यायची.शाळेच्या पटांगणात गोरगरिबांची , सामान्यांच्या मुलामुलींची लग्ने वाजतगाजत व्हायची. लग्नाला सारा गाव , पंचक्रोशीतील पाहुणे, ग्रामस्थ यायचे. शाळेतील वर्गखोल्या वरासाठी जानवसा घर, स्वयंपाक सामानघर म्हणून उपयोगात यायचे. 

शाळेत निरक्षरासांठी रात्रशाळा भरायची.साक्षरता अभियान त्याचे नाव गावातील निरक्षर (अंगठाबहाद्दर ) बायाबापडे रात्री जेवण आटोपले की , हातात काठी , कंदिल,पाटी ,पेन्सील घेऊन

शाळेकडे मार्गस्थ व्हायचे या सर्वांना शिकवण्याची जबाबदारी गुरूजींकडे असायची.पाटीवर पट्टीने रेषा मारून क,ख,ग चा वर्ग सुरू व्हायचा.आपण निरक्षर राहिलो याची बायाबापड्यांना लाज वाटायची पण शिकले सवरले पाहिजे असे मनोमन त्यांना वाटायचे

यातून निरक्षर साक्षर झाले असतीलही परंतू शिक्षणाची गरज व महत्व रूजवायला त्याकाळी नक्की  सुरूवात झाली.

गावाला शाळेने काय दिले? 

 आपल्या घरातील वृध्द आजोबा,आजींना विचारा शाळेविषयी , गुरूजींविषयी ते भरभरून बोलतील.

आज काळ बदललाय, साधने बदलली मोठ्या प्रमाणावर माहितीचा स्रोत उपलब्ध झाला.शाळांनी कात टाकली.जुन्या कौलारू,पत्रे , दगडातील इमारती कालबाह्य झाल्या. नवीन सुसज्ज, रंगरंगोटी असलेल्या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या.समाजातील दानशूर मंडळी पुढे आली.काहींनी शाळेला जागा दिली.तर काही व्यक्तीनी भौतिक सुविधांसाठी देणगी दिली.वाडवडीलांच्या दशक्रिया, पुण्यस्मरणच्या निमित्ताने शाळेला वस्तू , रोख रक्कम दानशूर व्यक्तींनी दिली.यानिमित्ताने पुण्य मिळेल हा उद्देश त्या पाठीमागे असेल तसेच मुलांचे , गाव पुढा-यांचे वाढदिवस मोठ्याप्रमाणात शाळेत साजरे होऊ लागले जेवणाच्या पंक्ती शाळेत झडू लागल्या.वाढदिवसानिमित्त काही दानशूर मंडळीनी शाळेला देणगी तसेच आवश्यक वस्तू दिल्या.अशाप्रकारे सर्व स्तरातून शाळेसाठी देणगी , निधी ओघ सुरू झाला ही खरोखरच चांगली गोष्ट आहे.

परंतू हे सर्व घडत असतांना शाळेसाठी काय गरजेचे आहे.याचा विचार समाजात जायला हवा. डिजिटल क्लासरूमने शाळा सजल्या , भौतिक सुविधा शाळांना मिळाल्या.मुले संगणकावर बोटे फिरवू लागली.परंतू आभासी जगतात विद्यार्थी रंगले.हे सर्व झाले म्हणजे शाळा गुणवत्तापूर्ण झाल्या असे म्हणता येणार नाही.विद्यार्थी शाळेत रमला पाहिजे. हसत ,खेळत, कृतीयुक्त आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे त्यांचा चौफेर विकास झाला पाहिजे . शाळा सर्व सोयी सुविधांनी युक्त झाल्या पाहिजे यासाठी काय करता येईल याचा विचार पालक , ग्रामस्थ ,सरपंच, दानशूर व्यक्ती यांनी एकत्र येऊन करायला हवा. तरच ख-या अर्थाने सुंदर, स्वच्छ, सर्व सुविधा युक्त,गुणवत्तापूर्ण शाळा व्हायला वेळ लागणार नाही.गावाकडे सध्या यात्रा,जत्रा,लग्नकार्य, वास्तुशांती,पुण्यस्मरण यांचा धुमधडाका सुरू आहे. जेवणावळी सुरू आहेत.अशा आनंदाच्या क्षणी शाळेला काय देता येईल याचा समाजाने विचार करायला हवा. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेसाठी काही सुजाण पालक देणगी  देत आहेत. परंतू आज ही लोकचळवळ व्हायला हवी तरच कुठेतरी उद्याची नवी आशा , दिशा पाल्याच्या निमित्ताने आपल्याला दिसणार आहे.

डिजिटल क्लासरूम सुरू झाली आहेच त्यासोबत सुसज्ज ग्रंथालय प्रत्येक शाळेत असायला हवे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय त्यामुळे निश्चितच लागेल.छोटे मोठे प्रयोग करण्यासाठी निरीक्षण, निष्कर्ष काढण्यासाठी कृतीतून अध्ययन करण्यासाठी स्वतंत्र 

प्रयोगशाळा असायला हवी.  तसेच संगणक लॅब , संगीतकला जोपासण्यासाठी  वाद्य साहित्य असायला हवे व त्याचा वापर व्हायला पाहिजे.मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध असावे.अशा अनेक सुविधा आपण दानशूर व्यक्ती , पालक , ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून करू शकतो परंतू त्यासाठी काम करण्याची इच्छा हवी दूरदृष्टीकोन असायला हवा.

शिक्षक,विद्यार्थी, पालक,  ग्रामस्थ एकत्र आले 

 तरच ख-या अर्थाने ही ज्ञानमंदीरे उजळून निघतील.एक संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य आपल्या हातून घडेल.

बाबा आमटे, प्रकाश आमटे , विकास आमटे यांनी आनंदवन, हेमलकसा,  वरोरा येथे आदिवासी लोकांसाठी शाळा , दवाखाना ,कुष्ठरोग्यासाठी काम केले हे सर्व उपक्रम, प्रकल्प राबवित असतांना त्यांनी आपल्या कामात ईश्वर पाहिला कोणत्याही ठिकाणी मंदिर उभारले नाही तरीही त्यांचे कार्य सफल झाले जगभरात नावलौकिक झाला.शाळा हेच ज्ञानमंदिर, विद्यार्थी हेच आमचे दैवत मानून आपण सर्वजण मिळून काम करू या व उज्वल भारत घडवू या !

Wednesday, 17 May 2023

माझा ब्लॉग माझे विचार - वाचनवेड

 

वाचनवेड 

"दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" असे समर्थ रामदासांनी  म्हटले होते.

वाचाल तर वाचाल. वाचनाने मन प्रगल्भ होते.परंतू सध्या मुलांचा पुस्तक वाचनाकडे ओढा कमी होत चालला आहे.क्रमिक पुस्तके सोडून विद्यार्थी इतर अवांतर वाचन जसे- गोष्टी, कविता संग्रह, आत्मकथा , कादंबरी, ऐतिहासिक पुस्तके, थोर नेते  यांच्यावर आधारित पुस्तके अशा वैविध्यपूर्ण पुस्तकांचे वाचन करतांना दिसत नाही.

वाचनाने व्यक्ती सुसंस्कारित होतो.आपल्या अवतीभोवती,परिसरात घडणा-या चांगल्या, वाईट घटना आपल्याला वर्तमानपत्रातून समजतात.वर्तमानपत्राचे दैनिक वाचन सुध्दा मुलांनी केले पाहिजे त्यातील लेखांचे वाचन , विविध विषयावरील सदरांचे बारकाईने वाचन करावे.शब्दकोडे सोडवावे.

पुस्तके वाचन मुले का करत नाही? यामागे अनेक कारणे असतील. गरीब परिस्थिती, पुस्तक विकत घेण्याची ऐपत नाही.परंतू एकमेकाच्या सहकार्यातून पुस्तक देवाणघेवाण च्या माध्यमातून  हा प्रश्न सुटू शकतो. पुस्तक प्रेमी मुलांशी मैत्री करावी.म्हणजे पुस्तके वाचनाचा मार्ग मोकळा होईल. मनात दुर्दम्य , प्रबळ इच्छा शक्ती असली तर कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होते.

मुलांचे मोबाईलवेड हे सुध्दा अवांतर वाचन न करण्यामागील कारण असू शकते आजकाल मुले मोबाईलवेडी झालेली आहेत.मोबाईलवर गेम खेळणे, यु ट्यूब व्हिडिओ , रिल पाहण्यात मुले वेळ घालवीत आहे.पालक मुलांचा हट्ट पुरवतात मुलांना महागडे मोबाईल घेऊन देतात.ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल वापरणे ठीक आहे किंवा अभ्यासासंदर्भात माहिती संदर्भ शोधणे , व्हिडिओ पाहणे अशा बाबींसाठी मोबाईल वापरण्यास हरकत कोणाचीही असणार नाही.पण मोबाईलचा इतर अनावश्यक कारणांसाठी वापर मुले करणार नाहीत याची आपण पालक म्हणून काळजी घेतली पाहिजे  व मुलांनी याबाबत समजूतदार पणा दाखविला पाहिजे जेवढा वेळ आपण मित्रमैत्रिणींबरोबर चॅटिंग करण्यात घालवतो तेवढ्या वेळात आपण एखादे पुस्तक वाचू शकतो.

दूरदर्शन (टि.व्ही) वरील मालिका, चित्रपट, गाणे मुले तासंनतास पाहत असतात घरातील पालक, ज्येष्ठ व्यक्ती सुध्दा टी.व्ही चा मनोरंजन म्हणून वापर करत असतात. हेही अवांतर पुस्तके न वाचण्याचे कारण असेल परंतू पालक म्हणून आपण काही बंधने आपल्या पाल्यासाठी पाळायला हवीत अशा मनोरंजन साधनांचा वापर कमीत कमी वापरण्याकडे लक्ष द्यायला हवे. काही चांगले  संस्कारक्षम चित्रपट,( श्यामची आई , छत्रपती शिवाजी महाराज ) ऐतिहासिक मालिका (छत्रपती संभाजीराजे) मुलांना आवर्जून दाखवा.त्यातून मुलांना नीती,मूल्ये मिळतील त्यांची आज मुलांना समाजाला गरज आहे.

पालकांनी आवर्जून पुस्तके मुलांसाठी खरेदी केली पाहिजे व आपल्या घरामध्ये छोटेसे ग्रंथालय साकारले पाहिजे पालकांनी पुस्तके वाचायला सुरूवात केली तर मुले पालकांचे निश्चितच अनुकरण करतील. व पुस्तके  वाचतील.

'आधी केले मग सांगितले'.असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे या उक्तीप्रमाणे पालकांनी स्वतःपासून वाचनाची सुरूवात केली पाहिजे.व नंतर मुलांना सांगितले पाहिजे .मुले अनुकरणप्रिय असतात आपले आई,वडील वाचन करतांना जर मुलांना दिसले तर मुलेही पुस्तक घेऊन वाचायला सुरूवात करतील. आयुष्यभर शिकण्याची आवड माणसात निर्माण झाली पाहिजे.

मुलांना वाचनाची एकदा सवय लागली की ते भराभरा पुस्तके वाचून काढतील.मुलांचा वाचनाचा वेग वाढेल. विविध पुस्तके मुले वाचतील ,वाचनाचे वेड मुलांना लागेल. मुलांमध्ये शब्दसंपत्ती वाढेल वाचलेल्या पुस्तकांचा सारांश, मतितार्थ मुले इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतील मुलांचे संभाषण कौशल्य वाढेल,कथा,कविता मुले करू लागतील. एवढेच नव्हे तर मुले पुस्तकातील टिपणे काढतील लिहीण्याची सवय मुलांना लागेल, शुध्द वळणदार हस्ताक्षर होईल.

एकदा की वाचनाचे वेड मुलांना लागले की ते थांबवायचा प्रयत्न कोणीच करू शकणार नाही.वाचनाने विचार करण्याची शक्ती वाढेल मनन, चिंतन मुले करतील इतर अनावश्यक गोष्टींपासून मुले आपोआपच दूर जातील.  घरामध्ये एक सुसंस्कारित असे वातावरण तयार होईल. पालकांनी आपल्या गावाजवळ ,शहरात कोठेही पुस्तक प्रदर्शन भरले असेल तर वेळ काढून आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी घेऊन जा त्यांना पुस्तकांचे प्रदर्शन फिरून दाखवा.चांगली पुस्तके आपल्या पाल्यांसाठी वाचनासाठी खरेदी करा. त्याचा निश्चितच फायदा होईल.तोटा होणार नाही.

 नात्यातील,मित्रांच्या मुलांच्या वाढदिवसाला जातांना इतर अनावश्यक भेट देण्यापेक्षा आवर्जून पुस्तक भेट द्या. घेणा-याला निश्चित आनंद होईल व देणा-याला पुस्तक दिल्याचे समाधान मिळेल.

"इवलेसे रोप लावियले द्वारी|

त्याचा वेलू गेला गगनावरी"||

असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणून पालकांनी आपल्या घरात एक छोटेसे ग्रंथालय उभारा त्याचा उपयोग स्वतःकरा व मुलांना सुध्दा वाचनाची गोडी लावा. आणि पहा काही दिवसांनी आपली मुले नक्कीच सुसंस्कारित होतील,समृध्द होतील.एक सुसंस्कारित,आदर्श पिढी घडविण्याचे पुण्य आपल्याला नक्की लाभेल हीच काळाची गरज आहे .

चला तर मग आपल्या पासूनच कार्याला सुरूवात करू या .....

- कैलास भागवत,  संगमनेर

Thursday, 11 May 2023

माझा ब्लॉग , माझे विचार - आनंदी सुट्टी

आनंदी सुट्टी 
 

आनंददायक  सुट्टी कशी घालवावी 

  •    निसर्गाशी हितगुज 
  •    संस्कारक्षम वातावरण निर्मिती 
  •    वाचनवेड 
  •    कला कौशल्यास वाव 
  •      गप्पांची  मैफल 
  •   व्यावहारिक शिक्षण 

 आनंदी सुट्टी


 शाळांना नुकतीच उन्हाळी सुट्टी लागली.शाळेत दिवसभर विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अध्ययन करत असतात. मित्रांबरोबर हसत खेळत शिक्षण घेत असतात परंतू आता सुट्टी लागल्याने पालकांना मुलांना दिवसभर सांभाळतांना मोठी कसरत करावी लागत आहे . पालक सहज शिक्षकांना सांगतात "सर तुम्ही शाळेत दिवसभर मुले कशी सांभाळता ? , तुमचे कौशल्य आहे बुवा " आम्हांला दिवसभर मुले त्रास देत असतात.अशी तक्रार पालक करत असतात.

सुट्टीच्या दिवसात मुले बाहेरील खाऊ खातात. मे महिन्याचा उन्हाचा कडाका जाणवतो आहे. दिवसभर मुले उन्हात खेळतात आजारी पडतात पालकांचे ऐकत नाही. मग पालक मुलांना उन्हाळी शिबिरात  पाठवतात , मुलांना कोठेतरी गुंतवून ठेवण्याचा पालक प्रयत्न करीत असतात.किंवा मुलांना मामाच्या गावाला पाठवून दिले जाते. विद्यार्थ्यांची सुट्टी आनंदात जावे असे प्रत्येक पालकाला वाटत असते. पण त्यासाठी मुलांना बाहेरगावी पाठविणे किंवा उन्हाळी शिबिरात पाठवणे हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. घर , परिसर, गाव या परिघात मुलांसाठी उन्हाळी सुट्टी आपण आनंदात घालवू शकतो.घर ,परिसर,निसर्गात खूप काही शिकण्या सारखे असते.आपण ते डोळस नजरेने बघायला हवे.आजूबाजूला घडणा-या गोष्टी,बदल हे निरीक्षणातून अनुभवायला हवे निसर्गाशी हितगुज     करायला आपण मुलांना शिकवले पाहिजे   त्यासाठी मात्र पालक म्हणून  दिवसभराचे नियोजन करणे ही आपली निश्चित जबाबदारी आहे.

सकाळी मुलांना सुर्योदयापूर्वी लवकर उठवावे. पायी फिरायला सोबत घेऊन जावे.निसर्गात प्राणायाम, सुर्यनमस्कार, हलके सोपे व्यायामप्रकार करावेत.मन प्रसन्न होते.शरीर  लवचिक राहते.दिवसभर मुले फ्रेश राहतात. 

 घरी आल्यानंतर  अंघोळ करून देवपूजन करण्यासाठी आपल्याबरोबर बसवावे. देवासाठी फुले आणणे, हार तयार करणे,  दिवा लावणे, देवाला नमस्कार करणे घरातील ज्येष्ठ सर्वांना नमस्कार करणे असे संस्कार नकळतपणे मुलांवर करावे.आरोग्यदायी नाष्टा मुलांसाठी करून ठेवला तर मुले बाहेरचे खाणे टाळतील. मटकी मोड आलेली उसळ, खारट , तिखट शेंगदाणे,फुटाणे,मुरमुरे चिवडा, गाजर , काकडी , बीट असा आरोग्यदायी आहार सुका मेवा करून ठेवावा.हंगामी फळे आंबे , करवंदे , जांभळे  यांचा समावेश आहारात करावा. असा  आहार असेल तर  तेलकट कुरकुरे, वेफर्स, बिस्कीटे,वडे हे पदार्थ आपोआप टाळले जातील ही काळजी महिलांनी घेतली पाहिजे.

वाचन संस्कृती जोपासणे फार गरजेचे आहे त्यासाठी घरात वाचनकोपरा तयार करावा. वाचनातून एक संस्कारक्षम पिढी घडत असते. वाचनाची आवड मुलांचे व्यक्तिमत्व समृद्ध करते . मुलांचे वाचन सुधारण्यासाठी गोष्टींचे पुस्तके , थोर व्यक्तींचे चरित्र, आत्मकथा,वर्तमानपत्रे घरी आणा.आपण वाचा म्हणजे मुले तुमच्याबरोबर वाचत बसतील. मुलांना वाचनवेड लागले पाहिजे  पुस्तक वाचल्यानंतर त्यातील चांगले विचार, चारोळी लिहून काढा . वर्तमानपत्रातील बातम्या , बोधकथा ,लेख वाचा. त्यांचे कात्रण कापा व संग्रह करा.शब्दकोडे सोडवा. 

घरातील छोटी कामे मुलांकडून गोड बोलून करून घ्या . झाडून घेणे, भांडी घासणे , पाणी आणणे,जनावरांना चारा घालणे मुलांना कामाची सवय लागते. 

       . दुपारच्या वेळी कॅरमबोर्ड, बुध्दीबळ हे आधुनिक खेळ खेळा तसेच चल्लसपाणी, खडे, चिंचोके असे जुने पारंपारिक खेळ खेळावे बाहेर उन्हात खेळायला जाण्याची गरज पडणार नाही पण ही साधने मुलांना पालकांनी उपलब्ध करून द्यावी.दुपारच्या वेळेस मुले आईस्क्रीम साठी आग्रह धरतात त्यावेळेस लिंबू सरबत , ताक , माठातील थंड पाणी दिले तर आईस्क्रीमची मुले मागणी करणार नाहीत.  अतिथंड फ्रीजमधील पदार्थ मुलांना देऊ नका. सायंकाळी सुर्यास्तापूर्वी परिसरातील वनस्पती , पिके, पक्षी, प्राणी यांचे निरीक्षण करा त्यांची माहिती मिळवा.घरी आल्यानंतर वहीत माहिती लिहा.

दररोज पेन्सीलनेआपल्या अवतीभोवती परिसरात असलेल्या प्राण्यांची , पक्ष्यांची , वस्तूंची , निसर्गाची चित्रे काढा सुरूवातीला जमणार नाही पण जाणीवपूर्वक चांगले निरीक्षण करून पुन्हा पुन्हा चित्र काढण्याचा प्रयत्न करा. सरावाने चांगले छान चित्र तुम्ही काढणार आपण स्वतः काढलेल्या चित्राचा आनंद अवर्णनीय असतो तो मुलांनी घेतलाच पाहिजे.मुलांच्या कला कौशल्यास वाव दिला पाहिजे सायंकाळी  परिसरातील मुलांनी एकत्र येऊन कबड्डी , खोखो , बॅडमिंटन , लंगडी , विटीदांडू  आट्यापाट्या, टायर फिरविणे असे पारंपरिक मैदानी खेळ अंगणात खेळावेत. त्यानंतर घरात आल्यावर स्वच्छ पाण्याने हात पाय धुवावेत  रात्र झाल्यावर देवापुढे दिवा लावावा. आरती म्हणावी.

जेवण झाल्यावर घराच्या ओसरीवर गप्पांची मैफल सुरू करावी.घरातील आजी, आजोबा,आई,वडील यांनी मुलांना संस्कारक्षम गोष्टी सांगाव्यात गाणे , गोष्टी, अंताक्षरी खेळ घ्यावे. टाळ्यांच्या तालावर पाढे पाठांतर करावे . दोन गट करून प्रश्नमंजुषा स्पर्धा घ्यावी. तोंडी बेरीज , वजाबाकी, गुणाकार,  भागाकार  उदाहरणे घ्यावीत ,गणित,विज्ञान कोडी घ्यावी विनोद , उखाणे , नकला घ्याव्यात.गाणे लावून नाच करावा. हातावर मेहंदी काढणे,  घरासमोर रांगोळी काढणे ही कला मुलामुलींना शिकवा.

तसेच आजूबाजूला जवळपास असणारे किल्ले,  धार्मिक स्थळे ,जत्रा,प्रदर्शने मुलांना अधूनमधून दाखवा.त्याची माहिती मिळवा.संग्रह करा .मुलांना मोबाईलवरील गेम पासून दूर ठेवा.चांगल्या शैक्षणिक वापरासाठी मोबाईलचा वापर करण्यास हरकत नाही. शैक्षणिक ॲप्स डाऊनलोड करा.मोबाईलचा अतिरेक टाळावा.

 दुकानात , बाजारात मुलांना घेऊन जा व्यवहाराची सवय लावा.वस्तू खरेदी, विक्री , नफा, तोटा समजून सांगा.तुमचा व्यवसाय असेल तर त्यात मुलांची मदत घ्या . व्यवसायातील बारकावे,कलाकुसर मुलांना शिकवा . मुले आनंदाने  काम करतात . व्यावहारिक शिक्षण आपोआप घडेल 

छंद हे असे साधन आहे की तणाव दूर करण्यास मदत करतात आनंद निर्माण करतात मुलांना विविध छंद जोपसण्यासाठी मदत करा . बासरी, हार्मोनियम, तबला , पखवाज, ढोलकी असे वाद्य मुलांना शिकवा त्यासाठी आपल्या परिसरातील गायक, वादक यांच्याकडे तासाभराची शिकवणी लावा.सराव करा आपला दिवस आनंदी होईल मुले सुट्टीचा आनंद अनुभवतील संस्कार मुलांवर नकळत घडतील.एवढे सगळे आनंददायी उपक्रम दिवसभरात दररोज घेतले तर सुट्टी आनंददायी हसत खेळत, निरोगी ,अभ्यासयुक्त होईल कला,छंद यांची आवड निश्चितच मुलांमध्ये निर्माण होईल.

"करी मनोरंजन जो मुलांचे , जडेल नाते प्रभूशी तयाचे " संस्कारक्षम पिढी बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू या !

Saturday, 8 April 2023

माझा ब्लॉग माझे विचार - शिक्षक ज्ञानाचा झरा

 

शिक्षक ज्ञानाचा झरा 


गुरूजी एक नाव होते

विद्यार्थ्याचे दैवत होते.

गोरगरीबांचे कैवारी होते.

गावासाठी झगडणारे संत होते.


शिक्षक मूर्तीमंत अखंड वाहणारा ज्ञानाचा झरा असतो. कुंभार जसा मातीचा चिखल तयार करून तुडवतो, एकजीव करतो व त्याला हवा तसा आकार देतो.तसे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यासाठी आपली सर्व कौशल्ये पणाला लावतात.विद्यार्थ्यांमध्ये दडलेले,लपलेले सुप्त गुण अचूक ओळखतात व त्या गुणांना वाव मिळवण्यासाठी प्रयत्न करतात .जातीभेद,  गरीब,श्रीमंत शिक्षकांच्या ठिकाणी नसतोच मुळी माझा विद्यार्थी घडला पाहिजे , शिकला पाहिजे.हाच आशावाद ते बाळगून असतात . पूर्वीच्या काळी गुरूजींचा धाक विद्यार्थ्यांवर होता पालक आजही म्हणतात " गुरुजी रस्त्याने चालले की मुले खेळत असतील तर गुरूजींना पाहून पळून जायचे." गुरुजींचा धाक व कडक शिस्त यांची दहशत मुलांवर होती त्यास पालकांचा पाठिंबा होता.गुरूजींना गावात आदर होता. गावातील कोणताही कार्यक्रम गुरुजींशिवाय पार पडत नसे. गावातील सप्ताह,  पारायण,लग्न गुरुजींच्या पुढाकाराने होत. गावात कोणाच्या घरी पत्र आले की बायाबापडे ते वाचण्यासाठी गुरूजींच्या घरी जात .

सुख दुःखाचे प्रसंगात गुरूजी सामील होत.गावातील भांडणतंटे गुरूजी सोडवत असत. गुरूजी नावात भीतीयुक्त दरारा आत्मीयता, प्रेम , जिव्हाळा,आपुलकी होती. कोणतीही शैक्षणिक साधने नसतांना मुले अभ्यासात हुशार होती.पाढे पाठ होते वाचन , लेखनात प्रगत होती.अक्षर वळणदार होते.मूल्यसंस्काराचा ठेवा कळत नकळत घडत होता.प्रत्येक मुलांचे प्रगतिपुस्तक गुरूजींच्या डोक्यात होते.शाळेतील कोणता मुलगा हुशार,कोण खोडकर , कोण मठ्ठ,  कोण चतुर, कोण कलाकार गुरूजींना मुलांचे गुण , अवगुण ज्ञात होते.कोणाला पास करायचे, कोणाला नापास करायचे हे त्यांना ठाऊक होते.मुलांची शिक्षणकुंडलीच पालकांसमोर मांडली जायची. मागच्या वर्गात जरी विद्यार्थी राहिला तरी तावूनसुलाखून तो बाहेर पडत असे. पालकांचा गुरूजींना जाहीर पाठींबाच असायचा. "गुरूजी काय म्हणतो आमचा बाळ्या" अभ्यासात कसा काय ?नाहीतर ठेवा त्याला याच वर्गात " पालक सहज हसत म्हणायचे गुरूजींवर किती विश्वास होता.

गुरूजी शाळेचे, गावाचे चालतेबोलते व्यासपीठ होते.कुटुंबप्रमुख होते.आपल्या कुटुंबाची काळजी गुरूजींनी कधी केली नाही पण शाळेसाठी , गावासाठी गुरूजी राबले.


दिवसामागून दिवस गेले परिस्थिती बदलली. वाहतुकीची साधने गावात आली.गावातील माणसे बदलली.शाळेचे रूपडे पालटले शर्ट धोतर , पायजमा सद-यातील गुरूजी कालबाह्य झाले.

गावात बस आली.बसमधून शर्ट,पँट, बूट पेहराव असलेली व्यक्ती उतरली. ज्येष्ठ माणसाजवळ येऊन थांबले.व विचारू लागले

"बाबा शाळा कुठे आहे. " बाबांनी समोरच उभ्या असलेल्या इमारतीकडे बोट दाखविले व म्हणाले " ती बघा समोरच इमारत दिसते ती शाळा " शाळेसमोर ती व्यक्ती येताच त्यांनी  शाळेची नवीन इमारत तिचे पालटले रूप, जुनी कौल, पत्रा ,दगडी इमारत जाऊन त्या जागेवर शाळेची रंगीत,चित्रमय इमारत बघून सर थक्क झाले. 

मुलांनी एकच गलका केला. सर स्वप्नातून बाहेर आले ते मुलांच्या गोंगाटाने 

 "नवीन 'सर' आले".

गुरूजींची जागा सरांनी घेतली होती. मला तर वाटते 'गुरूजी ' शब्दात जो ओलावा, जिव्हाळा, प्रेम होते.ते कदाचित सर या शब्दात जाणवले नाही. 'सर' या शब्दात जरी ते जाणवले नसेल पण ' सर 'ही व्यक्ती अफाट होती.आधुनिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम निश्चितच गुरूजींनी सुरू केले असेल."गुरूजींनी शिक्षणाचा पाया रचला, तर सरांनी त्यावर कळस चढविला." 

शाळेचे रंग रूप पालटले होते .शाळेच्या आतील , बाहेरील भिंती सजल्या होत्या.शाळेत टी.व्ही आला.बातम्या , बालचित्रवाणी कार्यक्रम मुलांना सर दाखवू लागले त्यानंतर 

 काॅमप्युटर आले सरांना हे सर्व नवीन होते.काॅमप्युटर कीबोर्ड वर बोटे फिरली मुले नवलाईने बघू लागली. गाणी , गोष्टी , संस्कारक्षम बालचित्रपट मुलांना पाहायला मिळू लागले. सरांनी काठी दूर कोप-यात ठेवली. मुले सरांच्या जवळ आले सर मुलांशी एकरूप झाले.गाणी , गप्पा रंगल्या व येथेच आनंददायी शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू केला.लाजरी,बुजरी मुले शाळेत येऊ लागली. बोलू लागली.शिक्षण घेऊ लागली. सर गावात दिसले की सरांच्या जवळ येऊ लागली. सरांना बाय बाय , टाटा करू लागली.सर व मुलांचा दुरावा कमी झाला. स्पर्धा परिक्षेत चमकू लागली.सरांचे नाव गावात झाले.गाव शाळेत आले.शाळा गावात गेली.शाळेत विविध समित्या स्थापन झाल्या. सरकारी तांदूळ मुलांना शाळेत पिशवीतून मिळू लागला. शाळेत रेशन दुकान सुरू झाले.सर तांदळाच्या पिशव्या मुलांना रांगेत वाटू लागले. वाटपाच्या नोंदी रजिस्टर वर ठेवू लागले अधिकारी,ग्रामस्थ यांच्या शाळेकडे भेटी वाढल्या.

 शाळेत जेवणाच्या दररोज पंगती उठू लागल्या शालेय षोषण आहार शिजवण्यासाठी भाजीपाला खरेदी सर करू लागले.तेल , मीठ , तिखट मसाला यांच्या नोंदी घेऊ लागले.तांदळाचे पोती वाहू लागले.  आनंदी शिक्षणाची हेळसांड सुरू झाली.सर अहवाल लिहिण्यात व ते पोहोच करण्यात व्यस्त झाले.शौचालय, प्राण्यांचे  सर्वेक्षण करू लागले

तरी सुध्दा शिक्षणांची उपेक्षा सरांनी होऊ दिली नाही .वेळ काढून, जादा तास घेऊन मुले हुशार केली , सर्वगुणसंपन्न केली प्रत्येक क्षेत्रात मुले तालुक्यात, जिल्ह्य़ात चमकवली.  भाषण , नाटक , नृत्य,  मैदानी खेळ हे सर्व सर घेत होते. पाचवा वेतन आयोग आला सरांचा पगार भरघोस वाढला.गावात राहणारे' सर' शहरात गेले.सायकलवर फिरणारे सर आता चक्क नवीन मोटारसायकल वर शाळेत येऊ लागले.गाव व शिक्षक यांच्यातील जवळीक कमी झाली गावातील कार्यक्रमातील सरांचा राबता  कमी झाला.गावात पुढारी कार्यकर्ते, पक्ष संघटना वाढीस लागल्या जुने कार्यकर्ते व तरुण कार्यकर्ते यांचा मेळ बसेना गावात कुरघुडी, राजकारण सुरू झाले.त्याचा फटका शाळेला बसला.सरांवर गाव लक्ष ठेवू लागले गावचे राजकारण शाळेत आले.अमूक शिक्षक चांगला तमूक, शिक्षक वाईट, शाळेतील तक्रारी तालुक्याला गेल्या सरांच्या तक्रारी बदल्या होऊ लागल्या . सरांचे राहणीमान, 

चारचाकी गाडीत सुटाबुटात येणारे सर गावातील लोकांना खूपू लागले सरांविषयी आपुलकी , प्रेम , जिव्हाळा कमी झाला. काही ग्रामस्थ याला अपवाद होते सरांविषयी अजूनही प्रेम आपुलकी तसूभरही कमी झाली नव्हती.आपला मुलगा उच्चशिक्षित होऊन नोकरीला लागला यामागे गुरूजींची , सरांची मेहनत होती हे ते विसरले नव्हते.

दिवसामागून दिवस गेले.आनंददायी शिक्षण हायटेक झाले. संगणक लॅब , वाचनालय, प्रयोगशाळा,सुसज्ज इमारत, भौतिक सुविधां , रंगरंगोटीनी शाळा सजल्या , लोकवर्गणीतून शाळेत सुविधा वाढल्या सरकारी शाळांतील मुले इंग्रजी लिहू वाचू लागली,संभाषण करू लागली . स्कॉलरशिप,  नवोदय परिक्षेत यशस्वी झाली . इंग्रजी माध्यमातील मुलांचा ओढा पुन्हा गावातील सरकारी मराठी माध्यमांच्या शाळांकडे वाढला. 

 कार्यकर्ते,  पुढाऱ्यांचे वाढदिवसानिमित्त , माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला भरघोस मदत मिळू लागली.पालक , ग्रामस्थ  यांच्या सरांकडून शिक्षणाविषयी अपेक्षा वाढल्या. फक्त ज्ञानदानाचे कार्य शिक्षक करत असतांना शाळाबाह्य, अशैक्षणिक कामे, यात आमचा शिक्षक गुरफटून न जावो. याची काळजी समाज , सरकार यांना घ्यावी लागेल नाहीतर गरिबांच्या सरकारी शाळांचे खाजगीकरण होण्यास वेळ लागणार नाही. 

 सर जीव ओतून आपले ज्ञानदानाचे काम करत आहेत .स्पर्धा वाढली तसे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा यासाठी सर्व शिक्षक राबत आहेत . ज्ञानाचा कुंभ कधीच रीता झालेला नाही. विविध अध्यापनाचे कौशल्ये सरांनी आत्मसात केली.मूल्यसंवर्धनाची बीजे रोवली कला, कौशल्य आनंद दायी,ज्ञानरचनावादी , संगणक शिक्षण,  प्रयोगशील, कृतीशील शिक्षणाची गंगा अविरत वाहती झाली.गुरू शिष्याचे नाते आणखी घट्ट झाले. पालक, शिक्षक, समाज एकत्र आला तर शाळेची प्रगती होऊ शकते हे सर्वांनी अनुभवले.अखंड ज्ञानाचा झरा वाहता झाला कधीही न थांबणारा !

Thursday, 23 March 2023

माझा ब्लाॅग माझे विचार - अभ्यासाचा कंटाळा

 

अभ्यासाचा कंटाळा 

विद्यार्थ्यांना शाळेत, घरी हल्ली अभ्यासाचा कंटाळा येतो. असे का बरे होते ? सर खेळायला सोडा अशी आर्जव मुले सायंकाळी चार वाजले की करतात.अध्यापनाची पध्दत, नीरस वातावरण, तोच तो  अभ्यास यामुळेच शाळेत मुले कंटाळतात.

 मुले नेहमी नावीन्याच्या शोधात असतात. त्यासाठी शिक्षक , पालकांनी मुलांचा कल, आवड याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे . 

शाळेत सकाळी जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा ते खूप आनंदी असतात.आपले मित्र, वर्गशिक्षक यांची भेट होणार असते. अशा मुलांचे निरीक्षण शिक्षकांनी करायला हवे शिक्षकांची गाडी आली की मुले आनंदाने धावतपळत  शिक्षकांजवळ येतात. Good morning sir  म्हणतात येथूनच संवादाला सुरूवात होते. आपण ही लगेच म्हटले पाहिजे Good morning children मुलांशी मराठी , इंग्रजीतून किंवा त्यांच्या बोलीभाषेतून संवाद साधला तर मुलांना छान वाटते ते खूप बोलतात. दिवसाची छान सुरूवात होते. पण आपण संवाद साधला नाही निरुत्साह दाखवला. चेहऱ्यावर हास्य दाखविले नाही.तर मुले नाराज होतात.सर आपल्याबरोबर आज बोललेच नाही अशी आपसात चर्चा करतात.

 परिपाठात दररोज मुलांना भरपूर संधी द्यायला हवी, गोष्ट,  सुविचार , पाढे,  इंग्रजी , मराठी प्रश्न , प्रार्थना, समूहगीत गायन मुले आनंदाने परिपाठात रममाण होतील.आनंददायी वातावरणात परिपाठ झाला तर मुले नवीन शिकतील, चैत्रात जशी झाडांना पालवी फुटते तशी मुलांना नव चैतन्याची पालवी फुटते त्यांना ज्ञानाचे घुमारे फुटतात.

वर्गात जेव्हा मुले प्रवेश करतात तेव्हा मुलांमध्ये भीतीचे वातावरण नसावे नाही तर अध्यापन कंटाळवाणे होईल मुले हसत खेळत आनंददायी वातावरणात शिकले पाहिजे यासाठी गोष्ट,गाणी, कविता, विनोद ,छोटे छोटे खेळ अधूनमधून वर्गात घेतले पाहिजे त्यांना खेळाच्या मैदानावर घेऊन गेले पाहिजे . नाविन्यपूर्ण खेळ ,मनोरंजक खेळ,मैदानी खेळ घ्यायला हवेत असे खेळातून शिक्षणाकडे मुलांना घेऊन जाता येईल.असे नियोजन दिवसभरात झाले तर मुलांना अभ्यासाचा अजिबात कंटाळा येणार नाही. अध्ययन सुलभ होईल मुलांचा दिवस आनंदात जाणार शाळा सुटण्याची सायंकाळी बेल झाल्यावर मुले आनंदाने घरी जायला निघतात.धावत पळत घरी पोहचतात.व तेथून पुढे पालकांची जबाबदारी सुरू होते. पालकांनी मुलांना जा रे  दप्तर व्यवस्थित ठेव हात पाय स्वच्छ धुवून घे . काहीतरी खा.असे म्हटले पाहिजे. जवळ बस. मुलांची विचारपूस करायला हवी. मग आजचा शाळेचा दिवस कसा गेला. सरांनी काय शिकविले,  अभ्यास काय दिला ? तुला शाळा आवडते का? मुले भरभरून शाळेविषयी ,अभ्यासाविषयी सांगतात.मुलांशी दमदाटीने बोललात, वागलात तुला काहीच येत नाही तू 'ढ' आहेस तुझ्या सरांनी तुला काही शिकविले नाही का? असे जर मुलांशी उद्धटपणे जर पालक मुलांशी वागले तर मुले बुजरी, घाबरट होतील. अभ्यास करण्याचा कंटाळा करतील. पालकांच्या धाकाने अभ्यासावर परिणाम होईल म्हणून मुलांच्या कलाने, आवडीने घ्यायला हवे,  खेळायला जा तेथून आल्यावर अभ्यास कर , वाचन कर . मोकळे वातावरण असेल तर मुलांना अभ्यासाचा कंटाळा येणार नाही .त्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त घरात एका कोपर्‍यात मुलांसाठी छोटेसे ग्रंथालय असावे आपण मुलांसमोर वाचायला बसले की मुलेही पुस्तक वाचतील पालक मुलांसमोर टि.व्ही पाहत असतील तर मुलेही पाहतील मुले शिक्षकांचे,पालकांचे अनुकरण करत असतात. म्हणून आपण मुलांसमोर वावरतांना आरशासारखे स्वच्छ, निर्मळ , सृजनशील, आनंदी राहायला हवे . असे आनंददायी वातावरण शाळेत व घरी असेल तर मुलांना अभ्यासाचा कंटाळाच येणार नाही.मुले आनंदाने अभ्यास करतील.


बांधून तोरण आनंदाचे 

दिन हा साजरा व्हावा 

मुलांचा जीव इथे रमावा

कंटाळा कधी ना यावा .


हसत खेळत, नाचून बागडावे 

पाढे म्हणावे ,भाषण करावे.

आनंदाने कविता, गाणी गावे

आनंदाच्या गावाला खुशाल जावे. 


- कैलास भागवत (प्राथमिक शिक्षक) 

जि.प.प्राथ.शाळाआंबीखालसा ता. संगमनेर

 जि.अ.नगर

गुरुवर्य : https://guruvary.blogspot.in