Thursday, 11 May 2023

माझा ब्लॉग , माझे विचार - आनंदी सुट्टी

आनंदी सुट्टी 
 

आनंददायक  सुट्टी कशी घालवावी 

  •    निसर्गाशी हितगुज 
  •    संस्कारक्षम वातावरण निर्मिती 
  •    वाचनवेड 
  •    कला कौशल्यास वाव 
  •      गप्पांची  मैफल 
  •   व्यावहारिक शिक्षण 

 आनंदी सुट्टी


 शाळांना नुकतीच उन्हाळी सुट्टी लागली.शाळेत दिवसभर विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अध्ययन करत असतात. मित्रांबरोबर हसत खेळत शिक्षण घेत असतात परंतू आता सुट्टी लागल्याने पालकांना मुलांना दिवसभर सांभाळतांना मोठी कसरत करावी लागत आहे . पालक सहज शिक्षकांना सांगतात "सर तुम्ही शाळेत दिवसभर मुले कशी सांभाळता ? , तुमचे कौशल्य आहे बुवा " आम्हांला दिवसभर मुले त्रास देत असतात.अशी तक्रार पालक करत असतात.

सुट्टीच्या दिवसात मुले बाहेरील खाऊ खातात. मे महिन्याचा उन्हाचा कडाका जाणवतो आहे. दिवसभर मुले उन्हात खेळतात आजारी पडतात पालकांचे ऐकत नाही. मग पालक मुलांना उन्हाळी शिबिरात  पाठवतात , मुलांना कोठेतरी गुंतवून ठेवण्याचा पालक प्रयत्न करीत असतात.किंवा मुलांना मामाच्या गावाला पाठवून दिले जाते. विद्यार्थ्यांची सुट्टी आनंदात जावे असे प्रत्येक पालकाला वाटत असते. पण त्यासाठी मुलांना बाहेरगावी पाठविणे किंवा उन्हाळी शिबिरात पाठवणे हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. घर , परिसर, गाव या परिघात मुलांसाठी उन्हाळी सुट्टी आपण आनंदात घालवू शकतो.घर ,परिसर,निसर्गात खूप काही शिकण्या सारखे असते.आपण ते डोळस नजरेने बघायला हवे.आजूबाजूला घडणा-या गोष्टी,बदल हे निरीक्षणातून अनुभवायला हवे निसर्गाशी हितगुज     करायला आपण मुलांना शिकवले पाहिजे   त्यासाठी मात्र पालक म्हणून  दिवसभराचे नियोजन करणे ही आपली निश्चित जबाबदारी आहे.

सकाळी मुलांना सुर्योदयापूर्वी लवकर उठवावे. पायी फिरायला सोबत घेऊन जावे.निसर्गात प्राणायाम, सुर्यनमस्कार, हलके सोपे व्यायामप्रकार करावेत.मन प्रसन्न होते.शरीर  लवचिक राहते.दिवसभर मुले फ्रेश राहतात. 

 घरी आल्यानंतर  अंघोळ करून देवपूजन करण्यासाठी आपल्याबरोबर बसवावे. देवासाठी फुले आणणे, हार तयार करणे,  दिवा लावणे, देवाला नमस्कार करणे घरातील ज्येष्ठ सर्वांना नमस्कार करणे असे संस्कार नकळतपणे मुलांवर करावे.आरोग्यदायी नाष्टा मुलांसाठी करून ठेवला तर मुले बाहेरचे खाणे टाळतील. मटकी मोड आलेली उसळ, खारट , तिखट शेंगदाणे,फुटाणे,मुरमुरे चिवडा, गाजर , काकडी , बीट असा आरोग्यदायी आहार सुका मेवा करून ठेवावा.हंगामी फळे आंबे , करवंदे , जांभळे  यांचा समावेश आहारात करावा. असा  आहार असेल तर  तेलकट कुरकुरे, वेफर्स, बिस्कीटे,वडे हे पदार्थ आपोआप टाळले जातील ही काळजी महिलांनी घेतली पाहिजे.

वाचन संस्कृती जोपासणे फार गरजेचे आहे त्यासाठी घरात वाचनकोपरा तयार करावा. वाचनातून एक संस्कारक्षम पिढी घडत असते. वाचनाची आवड मुलांचे व्यक्तिमत्व समृद्ध करते . मुलांचे वाचन सुधारण्यासाठी गोष्टींचे पुस्तके , थोर व्यक्तींचे चरित्र, आत्मकथा,वर्तमानपत्रे घरी आणा.आपण वाचा म्हणजे मुले तुमच्याबरोबर वाचत बसतील. मुलांना वाचनवेड लागले पाहिजे  पुस्तक वाचल्यानंतर त्यातील चांगले विचार, चारोळी लिहून काढा . वर्तमानपत्रातील बातम्या , बोधकथा ,लेख वाचा. त्यांचे कात्रण कापा व संग्रह करा.शब्दकोडे सोडवा. 

घरातील छोटी कामे मुलांकडून गोड बोलून करून घ्या . झाडून घेणे, भांडी घासणे , पाणी आणणे,जनावरांना चारा घालणे मुलांना कामाची सवय लागते. 

       . दुपारच्या वेळी कॅरमबोर्ड, बुध्दीबळ हे आधुनिक खेळ खेळा तसेच चल्लसपाणी, खडे, चिंचोके असे जुने पारंपारिक खेळ खेळावे बाहेर उन्हात खेळायला जाण्याची गरज पडणार नाही पण ही साधने मुलांना पालकांनी उपलब्ध करून द्यावी.दुपारच्या वेळेस मुले आईस्क्रीम साठी आग्रह धरतात त्यावेळेस लिंबू सरबत , ताक , माठातील थंड पाणी दिले तर आईस्क्रीमची मुले मागणी करणार नाहीत.  अतिथंड फ्रीजमधील पदार्थ मुलांना देऊ नका. सायंकाळी सुर्यास्तापूर्वी परिसरातील वनस्पती , पिके, पक्षी, प्राणी यांचे निरीक्षण करा त्यांची माहिती मिळवा.घरी आल्यानंतर वहीत माहिती लिहा.

दररोज पेन्सीलनेआपल्या अवतीभोवती परिसरात असलेल्या प्राण्यांची , पक्ष्यांची , वस्तूंची , निसर्गाची चित्रे काढा सुरूवातीला जमणार नाही पण जाणीवपूर्वक चांगले निरीक्षण करून पुन्हा पुन्हा चित्र काढण्याचा प्रयत्न करा. सरावाने चांगले छान चित्र तुम्ही काढणार आपण स्वतः काढलेल्या चित्राचा आनंद अवर्णनीय असतो तो मुलांनी घेतलाच पाहिजे.मुलांच्या कला कौशल्यास वाव दिला पाहिजे सायंकाळी  परिसरातील मुलांनी एकत्र येऊन कबड्डी , खोखो , बॅडमिंटन , लंगडी , विटीदांडू  आट्यापाट्या, टायर फिरविणे असे पारंपरिक मैदानी खेळ अंगणात खेळावेत. त्यानंतर घरात आल्यावर स्वच्छ पाण्याने हात पाय धुवावेत  रात्र झाल्यावर देवापुढे दिवा लावावा. आरती म्हणावी.

जेवण झाल्यावर घराच्या ओसरीवर गप्पांची मैफल सुरू करावी.घरातील आजी, आजोबा,आई,वडील यांनी मुलांना संस्कारक्षम गोष्टी सांगाव्यात गाणे , गोष्टी, अंताक्षरी खेळ घ्यावे. टाळ्यांच्या तालावर पाढे पाठांतर करावे . दोन गट करून प्रश्नमंजुषा स्पर्धा घ्यावी. तोंडी बेरीज , वजाबाकी, गुणाकार,  भागाकार  उदाहरणे घ्यावीत ,गणित,विज्ञान कोडी घ्यावी विनोद , उखाणे , नकला घ्याव्यात.गाणे लावून नाच करावा. हातावर मेहंदी काढणे,  घरासमोर रांगोळी काढणे ही कला मुलामुलींना शिकवा.

तसेच आजूबाजूला जवळपास असणारे किल्ले,  धार्मिक स्थळे ,जत्रा,प्रदर्शने मुलांना अधूनमधून दाखवा.त्याची माहिती मिळवा.संग्रह करा .मुलांना मोबाईलवरील गेम पासून दूर ठेवा.चांगल्या शैक्षणिक वापरासाठी मोबाईलचा वापर करण्यास हरकत नाही. शैक्षणिक ॲप्स डाऊनलोड करा.मोबाईलचा अतिरेक टाळावा.

 दुकानात , बाजारात मुलांना घेऊन जा व्यवहाराची सवय लावा.वस्तू खरेदी, विक्री , नफा, तोटा समजून सांगा.तुमचा व्यवसाय असेल तर त्यात मुलांची मदत घ्या . व्यवसायातील बारकावे,कलाकुसर मुलांना शिकवा . मुले आनंदाने  काम करतात . व्यावहारिक शिक्षण आपोआप घडेल 

छंद हे असे साधन आहे की तणाव दूर करण्यास मदत करतात आनंद निर्माण करतात मुलांना विविध छंद जोपसण्यासाठी मदत करा . बासरी, हार्मोनियम, तबला , पखवाज, ढोलकी असे वाद्य मुलांना शिकवा त्यासाठी आपल्या परिसरातील गायक, वादक यांच्याकडे तासाभराची शिकवणी लावा.सराव करा आपला दिवस आनंदी होईल मुले सुट्टीचा आनंद अनुभवतील संस्कार मुलांवर नकळत घडतील.एवढे सगळे आनंददायी उपक्रम दिवसभरात दररोज घेतले तर सुट्टी आनंददायी हसत खेळत, निरोगी ,अभ्यासयुक्त होईल कला,छंद यांची आवड निश्चितच मुलांमध्ये निर्माण होईल.

"करी मनोरंजन जो मुलांचे , जडेल नाते प्रभूशी तयाचे " संस्कारक्षम पिढी बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू या !

No comments:

Post a Comment