शाळा एक ज्ञानमंदिर
"ही आवडते मज मनापासूनी शाळा | लाविते लळा ही, जसा माऊली बाळा "
प्र.के. अत्रे यांची छान अशी शाळेविषयी कविता आहे.माझ्या शाळेने मला घडविले ज्या ज्ञानमंदिरात मी अक्षरे गिरविले लिहायला वाचायला शिकलो.मूल्यशिक्षणाचे व स्वयंशिस्तीचे धडे मिळाले. ती माझी मराठी शाळा.
मराठी शाळा टिकल्या पाहिजे त्यांची भरभराट झाली पाहिजे.तिचे रूपडे पालटले पाहिजे ही आमची भूमिका असली पाहिजे.
पूर्वीची दगडी भिंती व छत पत्र्याचे किंवा कौलाची असलेली टुमदार शाळेची इमारत गावाचे वैभव होते.या शाळांमध्ये थोर व्यक्ती,नेते , उच्चशिक्षित अधिकारी,पदाधिकारी,शेतकरी,मजूर तसेच सर्वसामान्य नोकरदार वर्ग घडला.शिक्षण स्वयंपूर्ण, शिस्तीचे होते.श्रमदानातून शिक्षण मिळत होते.शाळेसाठी गाव राबायचे. शाळेचे कोणतेही काम असो गावकरी एकत्र यायचे बांधकाम असो किंवा साफसफाई असो श्रमदानातून सर्व काही घडायचे. यासाठी कामाचा कोणताही मोबदला पैसे घेतले जात नव्हते.एवढी आत्मयीता शाळेविषयी लोकांना होती.गावातून जातांना पाहुण्यांना सहज माणसे सांगायचे" ही आमची शाळा" या शाळेतून शिकून आम्ही मोठे झालो. मला अमूक गुरूजी होते.गुरूजी कडक शिस्तीचे होते गुरूजी गावात समोरून येतांना दिसले की आम्ही घाबरून पळून जायचो.परंतू गुरूजी शाळेसाठी खूप राबायचे शाळेभोवती झाडे लावणे त्याला काटयांचे कुंपण करणे,मुलांकडून झाडांना पाणी घालून घेणे कधीतर स्वतः गुरूजी ओढ्यावर जाऊन झाडांसाठी पाणी आणायचे व झाडांना घालायचे झाडांची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घ्यायचे. पाढे पाठांतर करून घ्यायचे वाचन,लेखन,गणिती क्रिया घ्यायचे भाषण कसे करावे हे शिकवायचे ,गाणी ,कविता सूरात म्हणायचे हे सर्व सांगतांना माणसांची छाती अभिमानाने फुलून यायची.शाळेच्या पटांगणात गोरगरिबांची , सामान्यांच्या मुलामुलींची लग्ने वाजतगाजत व्हायची. लग्नाला सारा गाव , पंचक्रोशीतील पाहुणे, ग्रामस्थ यायचे. शाळेतील वर्गखोल्या वरासाठी जानवसा घर, स्वयंपाक सामानघर म्हणून उपयोगात यायचे.
शाळेत निरक्षरासांठी रात्रशाळा भरायची.साक्षरता अभियान त्याचे नाव गावातील निरक्षर (अंगठाबहाद्दर ) बायाबापडे रात्री जेवण आटोपले की , हातात काठी , कंदिल,पाटी ,पेन्सील घेऊन
शाळेकडे मार्गस्थ व्हायचे या सर्वांना शिकवण्याची जबाबदारी गुरूजींकडे असायची.पाटीवर पट्टीने रेषा मारून क,ख,ग चा वर्ग सुरू व्हायचा.आपण निरक्षर राहिलो याची बायाबापड्यांना लाज वाटायची पण शिकले सवरले पाहिजे असे मनोमन त्यांना वाटायचे
यातून निरक्षर साक्षर झाले असतीलही परंतू शिक्षणाची गरज व महत्व रूजवायला त्याकाळी नक्की सुरूवात झाली.
गावाला शाळेने काय दिले?
आपल्या घरातील वृध्द आजोबा,आजींना विचारा शाळेविषयी , गुरूजींविषयी ते भरभरून बोलतील.
आज काळ बदललाय, साधने बदलली मोठ्या प्रमाणावर माहितीचा स्रोत उपलब्ध झाला.शाळांनी कात टाकली.जुन्या कौलारू,पत्रे , दगडातील इमारती कालबाह्य झाल्या. नवीन सुसज्ज, रंगरंगोटी असलेल्या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या.समाजातील दानशूर मंडळी पुढे आली.काहींनी शाळेला जागा दिली.तर काही व्यक्तीनी भौतिक सुविधांसाठी देणगी दिली.वाडवडीलांच्या दशक्रिया, पुण्यस्मरणच्या निमित्ताने शाळेला वस्तू , रोख रक्कम दानशूर व्यक्तींनी दिली.यानिमित्ताने पुण्य मिळेल हा उद्देश त्या पाठीमागे असेल तसेच मुलांचे , गाव पुढा-यांचे वाढदिवस मोठ्याप्रमाणात शाळेत साजरे होऊ लागले जेवणाच्या पंक्ती शाळेत झडू लागल्या.वाढदिवसानिमित्त काही दानशूर मंडळीनी शाळेला देणगी तसेच आवश्यक वस्तू दिल्या.अशाप्रकारे सर्व स्तरातून शाळेसाठी देणगी , निधी ओघ सुरू झाला ही खरोखरच चांगली गोष्ट आहे.
परंतू हे सर्व घडत असतांना शाळेसाठी काय गरजेचे आहे.याचा विचार समाजात जायला हवा. डिजिटल क्लासरूमने शाळा सजल्या , भौतिक सुविधा शाळांना मिळाल्या.मुले संगणकावर बोटे फिरवू लागली.परंतू आभासी जगतात विद्यार्थी रंगले.हे सर्व झाले म्हणजे शाळा गुणवत्तापूर्ण झाल्या असे म्हणता येणार नाही.विद्यार्थी शाळेत रमला पाहिजे. हसत ,खेळत, कृतीयुक्त आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे त्यांचा चौफेर विकास झाला पाहिजे . शाळा सर्व सोयी सुविधांनी युक्त झाल्या पाहिजे यासाठी काय करता येईल याचा विचार पालक , ग्रामस्थ ,सरपंच, दानशूर व्यक्ती यांनी एकत्र येऊन करायला हवा. तरच ख-या अर्थाने सुंदर, स्वच्छ, सर्व सुविधा युक्त,गुणवत्तापूर्ण शाळा व्हायला वेळ लागणार नाही.गावाकडे सध्या यात्रा,जत्रा,लग्नकार्य, वास्तुशांती,पुण्यस्मरण यांचा धुमधडाका सुरू आहे. जेवणावळी सुरू आहेत.अशा आनंदाच्या क्षणी शाळेला काय देता येईल याचा समाजाने विचार करायला हवा. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेसाठी काही सुजाण पालक देणगी देत आहेत. परंतू आज ही लोकचळवळ व्हायला हवी तरच कुठेतरी उद्याची नवी आशा , दिशा पाल्याच्या निमित्ताने आपल्याला दिसणार आहे.
डिजिटल क्लासरूम सुरू झाली आहेच त्यासोबत सुसज्ज ग्रंथालय प्रत्येक शाळेत असायला हवे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय त्यामुळे निश्चितच लागेल.छोटे मोठे प्रयोग करण्यासाठी निरीक्षण, निष्कर्ष काढण्यासाठी कृतीतून अध्ययन करण्यासाठी स्वतंत्र
प्रयोगशाळा असायला हवी. तसेच संगणक लॅब , संगीतकला जोपासण्यासाठी वाद्य साहित्य असायला हवे व त्याचा वापर व्हायला पाहिजे.मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध असावे.अशा अनेक सुविधा आपण दानशूर व्यक्ती , पालक , ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून करू शकतो परंतू त्यासाठी काम करण्याची इच्छा हवी दूरदृष्टीकोन असायला हवा.
शिक्षक,विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ एकत्र आले
तरच ख-या अर्थाने ही ज्ञानमंदीरे उजळून निघतील.एक संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य आपल्या हातून घडेल.
बाबा आमटे, प्रकाश आमटे , विकास आमटे यांनी आनंदवन, हेमलकसा, वरोरा येथे आदिवासी लोकांसाठी शाळा , दवाखाना ,कुष्ठरोग्यासाठी काम केले हे सर्व उपक्रम, प्रकल्प राबवित असतांना त्यांनी आपल्या कामात ईश्वर पाहिला कोणत्याही ठिकाणी मंदिर उभारले नाही तरीही त्यांचे कार्य सफल झाले जगभरात नावलौकिक झाला.शाळा हेच ज्ञानमंदिर, विद्यार्थी हेच आमचे दैवत मानून आपण सर्वजण मिळून काम करू या व उज्वल भारत घडवू या !