शिक्षणाची वारी
-----------------------------------
" नाही झाले पंढरीशी कधी जाणे
मुलांसाठी काहीच ठेवणार नाही उणे "
शाळा हीच आमची पंढरी , विद्यार्थी हेच माझे दैवत "
दरवर्षी जून महिन्यात पंढरीची वारी सुरू होते.संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई,संत सोपानदेव इत्यादी अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरकडे विठू माऊली च्या दर्शनासाठी रवाना होतात. हरिनामाचा जयघोष करत असंख्य वारकर्यांचे पाऊले पंढरीच्या दिशेने वळू लागतात.अगदी त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांची पाऊले जूनमध्ये सुट्टी संपल्यानंतर शाळेकडे अर्थात ज्ञानमंदिराकडे वळू लागतात."शाळा हीच पंढरी व शिक्षक हेच विठू माऊली "ही भावना मुलांच्या निरागस चेह-यावर दिसते.शिक्षकांप्रती असलेली आपुलकी मनात कायम घर करून बसलेली असते.आणि शिक्षक सुध्दा या ज्ञानरूपी निरागस, लोभस,अजान वारक-यांमध्ये विठ्ठलाला शोधत असतो.
मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम कुंभार करीत असतो.मातीला एकजीव करत असतांना तो तल्लीन होऊन जातो.परमेश्वराच्या चरणी लीन होतो.कामात परमेश्वर पाहतो.अगदी त्याप्रमाणेच शिक्षक आपल्या अध्यापनात लीन होतो.घरादाराची आठवण त्याला येत नाही. एवढं तादात्म्य, विषयरूप होऊन जातो, तो आमचा गुरूजन. भजनात,हरिपाठात जसे वारकरी तल्लीन होऊन नाचतात तसाच आमचा शिक्षक कविता,गाण्यात तल्लीन होऊन मुलांसोबत एकरूप होऊन भान हरपून नाचत असतो. वारकरी दिवसभर भजन हरिपाठात रमून जातो. रात्री पालखी तळावर भोजन झाल्यावर कसलीही काळजी चिंता मनात येत नाही. रात्री निवांत झोपी जातो. तसेच दिवसभर शिक्षक मुलांमध्ये समरस होतो,अध्यापन करतो.कृतीतून धडे कविता , बालगीते,गाणी शिकवतो.नाट्य,नृत्य शिकवतो.जेव्हा घरी येतो तेव्हा आत्मिक समाधानाची लाली त्याच्या चेहर्यावर उजळलेली असते. घरातील मुलाबाळांसोबत जेवण करतो.समरस होतो.रात्री समाधानाने झोपी जातो.
आषाढीच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिंड्या पंढरीकडे वाटचाल करीत असतात.शिक्षणाच्या वारीतही शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापासून दिंडी सुरू होते.विविध शालेय महोत्सव,जयंत्या , वृक्षलागवड,स्वच्छता अशा विविध विषयांवर वर्षभर दिंड्या काढल्या जातात. शिक्षणाचे वारकरी,धारकरी अगदी तनमनधनाने यात सहभागी होतात.पंढरीच्या वारीचे मुख्य आकर्षण म्हणजे गोल रिंगण हे रिंगण पार पडत असतांना माऊलीचा अश्व रिंगणात गोल फेरी मारतो. त्यावेळेस अश्व गेल्यानंतर वारकरी माती श्रध्देने कपाळाला लावतात.माऊलीचा विठुरायाचा जयघोष करतात. मराठी शाळांमध्ये उपक्रमांचे रिंगण,परिपाठ, श्लोक, पसायदान, विविध मनोरंजक खेळ,मैदानी खेळ वर्षभर चालू असतात. मैदानावरील मातीने शाळेतील हे शिक्षणाचे वारकरी कधी माखतात हे कळून सुध्दा येत नाही.एवढे मातीशी एकरूप होतात.शिक्षणातील पांडुरंग माझा शिक्षक हे सगळं तन्मयतेने, कुतूहलतेने पाहत असतो.शिष्याची प्रगती पाहत असतांना तो मनातून नक्कीच सुखावतो.
पंढरीच्या वारीत सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने सहभागी होतात.जातीभेद नसतोच मुळी मुखात एकच नाम 'विठुमाऊली ' शिक्षणाच्या वारीत सर्व जातीधर्माचे विद्यार्थी,पालक, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी होतात.एकमेकांत मिसळून जातात. शाळेसाठी एकरूप होऊन जातात. विद्यार्थी हितासाठी झटत असतात. जिल्हा परिषदेची मराठी शाळा ही एकमेव शाळा ज्या शाळेत सर्वजातीधर्मातील मुलेमुली प्रवेश घेतात.एकमेकांवर जातीधर्माच्या भिंती ओलांडून निस्सीम बंधू,भगिनी प्रमाणे प्रेम करतात.सर्व जगताला सर्वधर्मसमभावाचा संदेश जसा आमचा विठुराया देतो.तसाच आमचा शिक्षकही हा संदेश मुलांमध्ये रुजवतो, सर्वदूर पोहचवतो.
पंढरीचा पांडुरंग संताना आपल्या कडेवर ,अंगाखांद्यावर घेतो. त्यांचे कोडकौतुक करतो.
तसाच आमचा शिक्षक मुलांचे लाड करतो.मुलांच्या आरोग्याची काळजी घेतो.लहान मुलांचे डोळे पुसतो त्यांना कडेवर घेतो.त्यांना खाऊ देतो.गाणे, कविता म्हणतो.त्यांच्या सुख दु:खात सहभागी होतो.वारी अखंडपणे,अव्याहत सुरूच राहणार आहे.विठूमाऊलीचा जयघोष सुरूच राहणार आहे.संत ज्ञानेश्वर,संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत चोखामेळा आदी संताचा जयघोष ,नाव वर्षानुवर्ष दिंडीच्या माध्यमातून वारीत घुमणार.
शिक्षणाची वारीही वर्षानुवर्ष अव्याहतपणे सुरू आहे.उपक्रमांचे रिंगण फिरत आहे.शैक्षणिक दिंड्या अविरत चालूच आहे.सर्वधर्मसमभावाचा संदेश सर्वदूर जातो आहे. आम्ही एक आहोत.आमची पंढरी शाळा आहे.मुलांमध्ये आम्ही उद्याचे संत ,महंत, कीर्तनकार,शास्त्रज्ञ , डाॅक्टर,इंजिनिअर,गुरूजन
प्रशासकीय अधिकारी , पदाधिकारी , आदर्श नागरिक,उद्योजक बघत आहोत.घडवत आहोत.शिक्षणाची वारी अखंडपणे,अव्याहतपणे सुरू राहील.आपणही या वारीत तनमनधनाने सहभागी होऊ , सहकार्याची भावना ठेवू , सकारात्मक राहू, गुरूजनांचा मान राखू , एकजुटीने शाळेच्या विकासासाठी,विद्यार्थ्यांसाठी झटू या "आपली शाळा, मराठी शाळा " हा संदेश दूरवर पोहोचवूया
राम कृष्ण हरी 🙏
आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
- कैलास भागवत , संगमनेर
9011227586