Monday, 7 October 2024

माझा मराठीचे बोल कौतुके

      


मराठी भाषा अभिजात भाषा 

       माझा मराठीचे बोलू कौतुके l

       परि अमृताते हि पैजासी जिंके l

       ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन ll

  संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान , मराठीची महती व्यक्त केली आहे. अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दसमूहातून व्यक्त झाली आहे.

 मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला.मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे.जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. शके १११० मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे.

त्यानंतर ज्ञानेश्वरी वा भावार्थदिपिका ग्रंथाचे लेखन संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले 

 त्याचप्रमाणे संत चक्रधर स्वामी यांनी लिहिलेला लीळाचरित्र मराठीतील पहिला पद्य चरित्र ग्रंथ आहे.या ग्रंथातून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. संत रामदास स्वामी यांनी दासबोध तसेच संत तुकाराम यांची अभंगगाथा 

     ग्रंथातून समाज प्रबोधन केले. संत एकनाथांनी भागवत ग्रंथाची रचना करून मराठी

     भाषेच्या वैभवात भर घातली. १३ व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही 

     तितकीच आपलीशी वाटते.

कालानुक्रमाने १२५० ते १३५० यादवी काळातील सत्ता व १६०० ते १७०० या काळातील शिवरायांची सत्ता १७०० ते १८१८ पेशवाई सत्ता आणि १८१८ पासून १९४७ पर्यंत इंग्रजी सत्ता यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून आले.काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार पडत गेले.परंतू मराठी भाषेचे सौंदर्य कमी झाले नाही.मराठी भाषेतून अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या. आणि त्यात सातत्याने भर पडत आहे. भारत देशातील ९ राज्ये व ४ संघराज्य शासित प्रदेश आणि ११३ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे.इतरही अनेक देशांमध्ये मराठी बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.

कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. वि.दा.करंदीकर, कुसुमाग्रज, वि.स.खांडेकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चार साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहे.

     छत्रपती शिवरायांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठी भाषेची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवरायांनी मराठीचा १४०० शब्दांचा राजव्यवहारकोष तयार करून घेतला.मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन वसंतराव नाईक सरकारने मराठीचा ऐतिहासिक गौरव केला. 

   महात्मा फुले, वि.वा.शिरवाडकर, प्र.के.अत्रे, पु.ल.देशपांडे, चि.वि.जोशी, कुसुमाग्रज,

ग.दि.माडगुळकर, वि.स.खांडेकर, ना.सी.फडके यासारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मनामनातून जागृत ठेवली.संत तुकाराम, 

नामदेव शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखामेळा,बंका महार , सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तीपर काव्यरचना केल्या. व मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले.

मराठी साहित्यात प्रामुख्याने लेख, कथा, कविता, कादंबरी, नाटक, नाटय,बालसाहित्य, बालगीते, ललितलेख, विनोद, चारोळी, गझल, ओवी, अभंग,भजन,कीर्तन, पोवाडा, लावणी, भारुड, आरती, लोकगीत, गोंधळ यांचा समावेश होतो.एवढी समृद्ध आमची मराठी भाषा आहे. 

भारत सरकारने गुरुवार दि.३ ऑक्टोबर २०२४ रोजी अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला. मराठी भाषेबरोबर पाली, बंगाली, आसामी, प्राकृत भाषेला ही अभिजात भाषेचा दर्जा दिला.मराठी भाषेचा गौरव केला.मराठी भाषिकांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषिक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, महाराष्ट्र राज्य सरकार यांनी वेळोवेळी केंद्रसरकारकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले.

मराठी भाषा व तिचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन होईल. भाषेच्या संशोधनासाठी अनुदान आणि वित्तीय साहित्य मिळेल. मराठी साहित्याला उभारी मिळेल.मराठी साहित्य, कला,संगीत ,संस्कृती यांचा जागतिक स्तरावर प्रसार होईल.  चला तर मग मराठी भाषेचा वापर व प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रीयन व मराठी भाषिक म्हणून आपण जोमाने कार्य करू या . आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगू या

जय मराठी मातृभाषा , जय महाराष्ट्र 


कैलास भागवत, संगमनेर 

भ्रमणध्वनी - ९०११२२७५८६

No comments:

Post a Comment