आपले सण

                                       रक्षाबंधन
हिंदू पंचांगाप्रमाणे येणारी श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो..हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे.[१] या विधीस 'पवित्रारोपण' असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.
काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे.भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.


    बैलपोळा
पोळा म्हणजेच बैलपोळा हा श्रावण अमावस्या (किंवा भाद्रपद अमावास्या) या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो; शेतात पीक/धान्य कापणीला आलेले असते; सगळीकडे हिरवळ असते; श्रावणातले सण संपत आलेले असतात; एकूण आनंदाचे वातावरण असते.

या दिवशी बैलांचा थाट असतो. त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (की पराणी?) (जिच्या टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो अशी बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा शृंगार -?) गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणा्र्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) एक आंब्याच्या पानाचे मोठे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.

No comments:

Post a Comment