Sunday 21 May 2023

माझा ब्लॉग माझे विचार - शाळा एक ज्ञानमंदिर

 

शाळा एक ज्ञानमंदिर 


"ही आवडते मज मनापासूनी शाळा | लाविते लळा ही, जसा माऊली बाळा "

प्र.के. अत्रे यांची छान अशी शाळेविषयी कविता आहे.माझ्या शाळेने मला घडविले ज्या ज्ञानमंदिरात मी अक्षरे गिरविले लिहायला वाचायला शिकलो.मूल्यशिक्षणाचे व स्वयंशिस्तीचे धडे मिळाले. ती माझी मराठी शाळा.

मराठी शाळा टिकल्या पाहिजे त्यांची भरभराट झाली पाहिजे.तिचे रूपडे पालटले पाहिजे ही आमची भूमिका असली पाहिजे.

 पूर्वीची दगडी भिंती व छत पत्र्याचे किंवा कौलाची असलेली टुमदार शाळेची इमारत गावाचे वैभव होते.या शाळांमध्ये थोर व्यक्ती,नेते , उच्चशिक्षित अधिकारी,पदाधिकारी,शेतकरी,मजूर तसेच सर्वसामान्य नोकरदार वर्ग घडला.शिक्षण स्वयंपूर्ण, शिस्तीचे होते.श्रमदानातून शिक्षण मिळत होते.शाळेसाठी गाव राबायचे. शाळेचे कोणतेही काम असो गावकरी एकत्र यायचे बांधकाम असो किंवा साफसफाई असो श्रमदानातून सर्व काही घडायचे. यासाठी कामाचा कोणताही मोबदला पैसे घेतले जात नव्हते.एवढी आत्मयीता शाळेविषयी लोकांना होती.गावातून जातांना पाहुण्यांना सहज माणसे सांगायचे" ही आमची शाळा" या शाळेतून शिकून आम्ही मोठे झालो. मला अमूक गुरूजी होते.गुरूजी कडक शिस्तीचे होते गुरूजी गावात समोरून येतांना दिसले की आम्ही घाबरून पळून जायचो.परंतू गुरूजी शाळेसाठी खूप राबायचे शाळेभोवती झाडे लावणे त्याला काटयांचे कुंपण करणे,मुलांकडून झाडांना पाणी घालून घेणे कधीतर स्वतः गुरूजी ओढ्यावर जाऊन झाडांसाठी पाणी आणायचे व झाडांना घालायचे झाडांची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घ्यायचे. पाढे पाठांतर करून घ्यायचे वाचन,लेखन,गणिती क्रिया घ्यायचे भाषण कसे करावे हे शिकवायचे ,गाणी ,कविता सूरात म्हणायचे  हे सर्व सांगतांना माणसांची छाती अभिमानाने फुलून यायची.शाळेच्या पटांगणात गोरगरिबांची , सामान्यांच्या मुलामुलींची लग्ने वाजतगाजत व्हायची. लग्नाला सारा गाव , पंचक्रोशीतील पाहुणे, ग्रामस्थ यायचे. शाळेतील वर्गखोल्या वरासाठी जानवसा घर, स्वयंपाक सामानघर म्हणून उपयोगात यायचे. 

शाळेत निरक्षरासांठी रात्रशाळा भरायची.साक्षरता अभियान त्याचे नाव गावातील निरक्षर (अंगठाबहाद्दर ) बायाबापडे रात्री जेवण आटोपले की , हातात काठी , कंदिल,पाटी ,पेन्सील घेऊन

शाळेकडे मार्गस्थ व्हायचे या सर्वांना शिकवण्याची जबाबदारी गुरूजींकडे असायची.पाटीवर पट्टीने रेषा मारून क,ख,ग चा वर्ग सुरू व्हायचा.आपण निरक्षर राहिलो याची बायाबापड्यांना लाज वाटायची पण शिकले सवरले पाहिजे असे मनोमन त्यांना वाटायचे

यातून निरक्षर साक्षर झाले असतीलही परंतू शिक्षणाची गरज व महत्व रूजवायला त्याकाळी नक्की  सुरूवात झाली.

गावाला शाळेने काय दिले? 

 आपल्या घरातील वृध्द आजोबा,आजींना विचारा शाळेविषयी , गुरूजींविषयी ते भरभरून बोलतील.

आज काळ बदललाय, साधने बदलली मोठ्या प्रमाणावर माहितीचा स्रोत उपलब्ध झाला.शाळांनी कात टाकली.जुन्या कौलारू,पत्रे , दगडातील इमारती कालबाह्य झाल्या. नवीन सुसज्ज, रंगरंगोटी असलेल्या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या.समाजातील दानशूर मंडळी पुढे आली.काहींनी शाळेला जागा दिली.तर काही व्यक्तीनी भौतिक सुविधांसाठी देणगी दिली.वाडवडीलांच्या दशक्रिया, पुण्यस्मरणच्या निमित्ताने शाळेला वस्तू , रोख रक्कम दानशूर व्यक्तींनी दिली.यानिमित्ताने पुण्य मिळेल हा उद्देश त्या पाठीमागे असेल तसेच मुलांचे , गाव पुढा-यांचे वाढदिवस मोठ्याप्रमाणात शाळेत साजरे होऊ लागले जेवणाच्या पंक्ती शाळेत झडू लागल्या.वाढदिवसानिमित्त काही दानशूर मंडळीनी शाळेला देणगी तसेच आवश्यक वस्तू दिल्या.अशाप्रकारे सर्व स्तरातून शाळेसाठी देणगी , निधी ओघ सुरू झाला ही खरोखरच चांगली गोष्ट आहे.

परंतू हे सर्व घडत असतांना शाळेसाठी काय गरजेचे आहे.याचा विचार समाजात जायला हवा. डिजिटल क्लासरूमने शाळा सजल्या , भौतिक सुविधा शाळांना मिळाल्या.मुले संगणकावर बोटे फिरवू लागली.परंतू आभासी जगतात विद्यार्थी रंगले.हे सर्व झाले म्हणजे शाळा गुणवत्तापूर्ण झाल्या असे म्हणता येणार नाही.विद्यार्थी शाळेत रमला पाहिजे. हसत ,खेळत, कृतीयुक्त आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे त्यांचा चौफेर विकास झाला पाहिजे . शाळा सर्व सोयी सुविधांनी युक्त झाल्या पाहिजे यासाठी काय करता येईल याचा विचार पालक , ग्रामस्थ ,सरपंच, दानशूर व्यक्ती यांनी एकत्र येऊन करायला हवा. तरच ख-या अर्थाने सुंदर, स्वच्छ, सर्व सुविधा युक्त,गुणवत्तापूर्ण शाळा व्हायला वेळ लागणार नाही.गावाकडे सध्या यात्रा,जत्रा,लग्नकार्य, वास्तुशांती,पुण्यस्मरण यांचा धुमधडाका सुरू आहे. जेवणावळी सुरू आहेत.अशा आनंदाच्या क्षणी शाळेला काय देता येईल याचा समाजाने विचार करायला हवा. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेसाठी काही सुजाण पालक देणगी  देत आहेत. परंतू आज ही लोकचळवळ व्हायला हवी तरच कुठेतरी उद्याची नवी आशा , दिशा पाल्याच्या निमित्ताने आपल्याला दिसणार आहे.

डिजिटल क्लासरूम सुरू झाली आहेच त्यासोबत सुसज्ज ग्रंथालय प्रत्येक शाळेत असायला हवे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय त्यामुळे निश्चितच लागेल.छोटे मोठे प्रयोग करण्यासाठी निरीक्षण, निष्कर्ष काढण्यासाठी कृतीतून अध्ययन करण्यासाठी स्वतंत्र 

प्रयोगशाळा असायला हवी.  तसेच संगणक लॅब , संगीतकला जोपासण्यासाठी  वाद्य साहित्य असायला हवे व त्याचा वापर व्हायला पाहिजे.मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध असावे.अशा अनेक सुविधा आपण दानशूर व्यक्ती , पालक , ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून करू शकतो परंतू त्यासाठी काम करण्याची इच्छा हवी दूरदृष्टीकोन असायला हवा.

शिक्षक,विद्यार्थी, पालक,  ग्रामस्थ एकत्र आले 

 तरच ख-या अर्थाने ही ज्ञानमंदीरे उजळून निघतील.एक संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य आपल्या हातून घडेल.

बाबा आमटे, प्रकाश आमटे , विकास आमटे यांनी आनंदवन, हेमलकसा,  वरोरा येथे आदिवासी लोकांसाठी शाळा , दवाखाना ,कुष्ठरोग्यासाठी काम केले हे सर्व उपक्रम, प्रकल्प राबवित असतांना त्यांनी आपल्या कामात ईश्वर पाहिला कोणत्याही ठिकाणी मंदिर उभारले नाही तरीही त्यांचे कार्य सफल झाले जगभरात नावलौकिक झाला.शाळा हेच ज्ञानमंदिर, विद्यार्थी हेच आमचे दैवत मानून आपण सर्वजण मिळून काम करू या व उज्वल भारत घडवू या !

Wednesday 17 May 2023

माझा ब्लॉग माझे विचार - वाचनवेड

 

वाचनवेड 

"दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" असे समर्थ रामदासांनी  म्हटले होते.

वाचाल तर वाचाल. वाचनाने मन प्रगल्भ होते.परंतू सध्या मुलांचा पुस्तक वाचनाकडे ओढा कमी होत चालला आहे.क्रमिक पुस्तके सोडून विद्यार्थी इतर अवांतर वाचन जसे- गोष्टी, कविता संग्रह, आत्मकथा , कादंबरी, ऐतिहासिक पुस्तके, थोर नेते  यांच्यावर आधारित पुस्तके अशा वैविध्यपूर्ण पुस्तकांचे वाचन करतांना दिसत नाही.

वाचनाने व्यक्ती सुसंस्कारित होतो.आपल्या अवतीभोवती,परिसरात घडणा-या चांगल्या, वाईट घटना आपल्याला वर्तमानपत्रातून समजतात.वर्तमानपत्राचे दैनिक वाचन सुध्दा मुलांनी केले पाहिजे त्यातील लेखांचे वाचन , विविध विषयावरील सदरांचे बारकाईने वाचन करावे.शब्दकोडे सोडवावे.

पुस्तके वाचन मुले का करत नाही? यामागे अनेक कारणे असतील. गरीब परिस्थिती, पुस्तक विकत घेण्याची ऐपत नाही.परंतू एकमेकाच्या सहकार्यातून पुस्तक देवाणघेवाण च्या माध्यमातून  हा प्रश्न सुटू शकतो. पुस्तक प्रेमी मुलांशी मैत्री करावी.म्हणजे पुस्तके वाचनाचा मार्ग मोकळा होईल. मनात दुर्दम्य , प्रबळ इच्छा शक्ती असली तर कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होते.

मुलांचे मोबाईलवेड हे सुध्दा अवांतर वाचन न करण्यामागील कारण असू शकते आजकाल मुले मोबाईलवेडी झालेली आहेत.मोबाईलवर गेम खेळणे, यु ट्यूब व्हिडिओ , रिल पाहण्यात मुले वेळ घालवीत आहे.पालक मुलांचा हट्ट पुरवतात मुलांना महागडे मोबाईल घेऊन देतात.ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल वापरणे ठीक आहे किंवा अभ्यासासंदर्भात माहिती संदर्भ शोधणे , व्हिडिओ पाहणे अशा बाबींसाठी मोबाईल वापरण्यास हरकत कोणाचीही असणार नाही.पण मोबाईलचा इतर अनावश्यक कारणांसाठी वापर मुले करणार नाहीत याची आपण पालक म्हणून काळजी घेतली पाहिजे  व मुलांनी याबाबत समजूतदार पणा दाखविला पाहिजे जेवढा वेळ आपण मित्रमैत्रिणींबरोबर चॅटिंग करण्यात घालवतो तेवढ्या वेळात आपण एखादे पुस्तक वाचू शकतो.

दूरदर्शन (टि.व्ही) वरील मालिका, चित्रपट, गाणे मुले तासंनतास पाहत असतात घरातील पालक, ज्येष्ठ व्यक्ती सुध्दा टी.व्ही चा मनोरंजन म्हणून वापर करत असतात. हेही अवांतर पुस्तके न वाचण्याचे कारण असेल परंतू पालक म्हणून आपण काही बंधने आपल्या पाल्यासाठी पाळायला हवीत अशा मनोरंजन साधनांचा वापर कमीत कमी वापरण्याकडे लक्ष द्यायला हवे. काही चांगले  संस्कारक्षम चित्रपट,( श्यामची आई , छत्रपती शिवाजी महाराज ) ऐतिहासिक मालिका (छत्रपती संभाजीराजे) मुलांना आवर्जून दाखवा.त्यातून मुलांना नीती,मूल्ये मिळतील त्यांची आज मुलांना समाजाला गरज आहे.

पालकांनी आवर्जून पुस्तके मुलांसाठी खरेदी केली पाहिजे व आपल्या घरामध्ये छोटेसे ग्रंथालय साकारले पाहिजे पालकांनी पुस्तके वाचायला सुरूवात केली तर मुले पालकांचे निश्चितच अनुकरण करतील. व पुस्तके  वाचतील.

'आधी केले मग सांगितले'.असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे या उक्तीप्रमाणे पालकांनी स्वतःपासून वाचनाची सुरूवात केली पाहिजे.व नंतर मुलांना सांगितले पाहिजे .मुले अनुकरणप्रिय असतात आपले आई,वडील वाचन करतांना जर मुलांना दिसले तर मुलेही पुस्तक घेऊन वाचायला सुरूवात करतील. आयुष्यभर शिकण्याची आवड माणसात निर्माण झाली पाहिजे.

मुलांना वाचनाची एकदा सवय लागली की ते भराभरा पुस्तके वाचून काढतील.मुलांचा वाचनाचा वेग वाढेल. विविध पुस्तके मुले वाचतील ,वाचनाचे वेड मुलांना लागेल. मुलांमध्ये शब्दसंपत्ती वाढेल वाचलेल्या पुस्तकांचा सारांश, मतितार्थ मुले इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतील मुलांचे संभाषण कौशल्य वाढेल,कथा,कविता मुले करू लागतील. एवढेच नव्हे तर मुले पुस्तकातील टिपणे काढतील लिहीण्याची सवय मुलांना लागेल, शुध्द वळणदार हस्ताक्षर होईल.

एकदा की वाचनाचे वेड मुलांना लागले की ते थांबवायचा प्रयत्न कोणीच करू शकणार नाही.वाचनाने विचार करण्याची शक्ती वाढेल मनन, चिंतन मुले करतील इतर अनावश्यक गोष्टींपासून मुले आपोआपच दूर जातील.  घरामध्ये एक सुसंस्कारित असे वातावरण तयार होईल. पालकांनी आपल्या गावाजवळ ,शहरात कोठेही पुस्तक प्रदर्शन भरले असेल तर वेळ काढून आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी घेऊन जा त्यांना पुस्तकांचे प्रदर्शन फिरून दाखवा.चांगली पुस्तके आपल्या पाल्यांसाठी वाचनासाठी खरेदी करा. त्याचा निश्चितच फायदा होईल.तोटा होणार नाही.

 नात्यातील,मित्रांच्या मुलांच्या वाढदिवसाला जातांना इतर अनावश्यक भेट देण्यापेक्षा आवर्जून पुस्तक भेट द्या. घेणा-याला निश्चित आनंद होईल व देणा-याला पुस्तक दिल्याचे समाधान मिळेल.

"इवलेसे रोप लावियले द्वारी|

त्याचा वेलू गेला गगनावरी"||

असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणून पालकांनी आपल्या घरात एक छोटेसे ग्रंथालय उभारा त्याचा उपयोग स्वतःकरा व मुलांना सुध्दा वाचनाची गोडी लावा. आणि पहा काही दिवसांनी आपली मुले नक्कीच सुसंस्कारित होतील,समृध्द होतील.एक सुसंस्कारित,आदर्श पिढी घडविण्याचे पुण्य आपल्याला नक्की लाभेल हीच काळाची गरज आहे .

चला तर मग आपल्या पासूनच कार्याला सुरूवात करू या .....

- कैलास भागवत,  संगमनेर

Wednesday 10 May 2023

माझा ब्लॉग , माझे विचार - आनंदी सुट्टी

आनंदी सुट्टी 
 

आनंददायक  सुट्टी कशी घालवावी 

  •    निसर्गाशी हितगुज 
  •    संस्कारक्षम वातावरण निर्मिती 
  •    वाचनवेड 
  •    कला कौशल्यास वाव 
  •      गप्पांची  मैफल 
  •   व्यावहारिक शिक्षण 

 आनंदी सुट्टी


 शाळांना नुकतीच उन्हाळी सुट्टी लागली.शाळेत दिवसभर विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अध्ययन करत असतात. मित्रांबरोबर हसत खेळत शिक्षण घेत असतात परंतू आता सुट्टी लागल्याने पालकांना मुलांना दिवसभर सांभाळतांना मोठी कसरत करावी लागत आहे . पालक सहज शिक्षकांना सांगतात "सर तुम्ही शाळेत दिवसभर मुले कशी सांभाळता ? , तुमचे कौशल्य आहे बुवा " आम्हांला दिवसभर मुले त्रास देत असतात.अशी तक्रार पालक करत असतात.

सुट्टीच्या दिवसात मुले बाहेरील खाऊ खातात. मे महिन्याचा उन्हाचा कडाका जाणवतो आहे. दिवसभर मुले उन्हात खेळतात आजारी पडतात पालकांचे ऐकत नाही. मग पालक मुलांना उन्हाळी शिबिरात  पाठवतात , मुलांना कोठेतरी गुंतवून ठेवण्याचा पालक प्रयत्न करीत असतात.किंवा मुलांना मामाच्या गावाला पाठवून दिले जाते. विद्यार्थ्यांची सुट्टी आनंदात जावे असे प्रत्येक पालकाला वाटत असते. पण त्यासाठी मुलांना बाहेरगावी पाठविणे किंवा उन्हाळी शिबिरात पाठवणे हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. घर , परिसर, गाव या परिघात मुलांसाठी उन्हाळी सुट्टी आपण आनंदात घालवू शकतो.घर ,परिसर,निसर्गात खूप काही शिकण्या सारखे असते.आपण ते डोळस नजरेने बघायला हवे.आजूबाजूला घडणा-या गोष्टी,बदल हे निरीक्षणातून अनुभवायला हवे निसर्गाशी हितगुज     करायला आपण मुलांना शिकवले पाहिजे   त्यासाठी मात्र पालक म्हणून  दिवसभराचे नियोजन करणे ही आपली निश्चित जबाबदारी आहे.

सकाळी मुलांना सुर्योदयापूर्वी लवकर उठवावे. पायी फिरायला सोबत घेऊन जावे.निसर्गात प्राणायाम, सुर्यनमस्कार, हलके सोपे व्यायामप्रकार करावेत.मन प्रसन्न होते.शरीर  लवचिक राहते.दिवसभर मुले फ्रेश राहतात. 

 घरी आल्यानंतर  अंघोळ करून देवपूजन करण्यासाठी आपल्याबरोबर बसवावे. देवासाठी फुले आणणे, हार तयार करणे,  दिवा लावणे, देवाला नमस्कार करणे घरातील ज्येष्ठ सर्वांना नमस्कार करणे असे संस्कार नकळतपणे मुलांवर करावे.आरोग्यदायी नाष्टा मुलांसाठी करून ठेवला तर मुले बाहेरचे खाणे टाळतील. मटकी मोड आलेली उसळ, खारट , तिखट शेंगदाणे,फुटाणे,मुरमुरे चिवडा, गाजर , काकडी , बीट असा आरोग्यदायी आहार सुका मेवा करून ठेवावा.हंगामी फळे आंबे , करवंदे , जांभळे  यांचा समावेश आहारात करावा. असा  आहार असेल तर  तेलकट कुरकुरे, वेफर्स, बिस्कीटे,वडे हे पदार्थ आपोआप टाळले जातील ही काळजी महिलांनी घेतली पाहिजे.

वाचन संस्कृती जोपासणे फार गरजेचे आहे त्यासाठी घरात वाचनकोपरा तयार करावा. वाचनातून एक संस्कारक्षम पिढी घडत असते. वाचनाची आवड मुलांचे व्यक्तिमत्व समृद्ध करते . मुलांचे वाचन सुधारण्यासाठी गोष्टींचे पुस्तके , थोर व्यक्तींचे चरित्र, आत्मकथा,वर्तमानपत्रे घरी आणा.आपण वाचा म्हणजे मुले तुमच्याबरोबर वाचत बसतील. मुलांना वाचनवेड लागले पाहिजे  पुस्तक वाचल्यानंतर त्यातील चांगले विचार, चारोळी लिहून काढा . वर्तमानपत्रातील बातम्या , बोधकथा ,लेख वाचा. त्यांचे कात्रण कापा व संग्रह करा.शब्दकोडे सोडवा. 

घरातील छोटी कामे मुलांकडून गोड बोलून करून घ्या . झाडून घेणे, भांडी घासणे , पाणी आणणे,जनावरांना चारा घालणे मुलांना कामाची सवय लागते. 

       . दुपारच्या वेळी कॅरमबोर्ड, बुध्दीबळ हे आधुनिक खेळ खेळा तसेच चल्लसपाणी, खडे, चिंचोके असे जुने पारंपारिक खेळ खेळावे बाहेर उन्हात खेळायला जाण्याची गरज पडणार नाही पण ही साधने मुलांना पालकांनी उपलब्ध करून द्यावी.दुपारच्या वेळेस मुले आईस्क्रीम साठी आग्रह धरतात त्यावेळेस लिंबू सरबत , ताक , माठातील थंड पाणी दिले तर आईस्क्रीमची मुले मागणी करणार नाहीत.  अतिथंड फ्रीजमधील पदार्थ मुलांना देऊ नका. सायंकाळी सुर्यास्तापूर्वी परिसरातील वनस्पती , पिके, पक्षी, प्राणी यांचे निरीक्षण करा त्यांची माहिती मिळवा.घरी आल्यानंतर वहीत माहिती लिहा.

दररोज पेन्सीलनेआपल्या अवतीभोवती परिसरात असलेल्या प्राण्यांची , पक्ष्यांची , वस्तूंची , निसर्गाची चित्रे काढा सुरूवातीला जमणार नाही पण जाणीवपूर्वक चांगले निरीक्षण करून पुन्हा पुन्हा चित्र काढण्याचा प्रयत्न करा. सरावाने चांगले छान चित्र तुम्ही काढणार आपण स्वतः काढलेल्या चित्राचा आनंद अवर्णनीय असतो तो मुलांनी घेतलाच पाहिजे.मुलांच्या कला कौशल्यास वाव दिला पाहिजे सायंकाळी  परिसरातील मुलांनी एकत्र येऊन कबड्डी , खोखो , बॅडमिंटन , लंगडी , विटीदांडू  आट्यापाट्या, टायर फिरविणे असे पारंपरिक मैदानी खेळ अंगणात खेळावेत. त्यानंतर घरात आल्यावर स्वच्छ पाण्याने हात पाय धुवावेत  रात्र झाल्यावर देवापुढे दिवा लावावा. आरती म्हणावी.

जेवण झाल्यावर घराच्या ओसरीवर गप्पांची मैफल सुरू करावी.घरातील आजी, आजोबा,आई,वडील यांनी मुलांना संस्कारक्षम गोष्टी सांगाव्यात गाणे , गोष्टी, अंताक्षरी खेळ घ्यावे. टाळ्यांच्या तालावर पाढे पाठांतर करावे . दोन गट करून प्रश्नमंजुषा स्पर्धा घ्यावी. तोंडी बेरीज , वजाबाकी, गुणाकार,  भागाकार  उदाहरणे घ्यावीत ,गणित,विज्ञान कोडी घ्यावी विनोद , उखाणे , नकला घ्याव्यात.गाणे लावून नाच करावा. हातावर मेहंदी काढणे,  घरासमोर रांगोळी काढणे ही कला मुलामुलींना शिकवा.

तसेच आजूबाजूला जवळपास असणारे किल्ले,  धार्मिक स्थळे ,जत्रा,प्रदर्शने मुलांना अधूनमधून दाखवा.त्याची माहिती मिळवा.संग्रह करा .मुलांना मोबाईलवरील गेम पासून दूर ठेवा.चांगल्या शैक्षणिक वापरासाठी मोबाईलचा वापर करण्यास हरकत नाही. शैक्षणिक ॲप्स डाऊनलोड करा.मोबाईलचा अतिरेक टाळावा.

 दुकानात , बाजारात मुलांना घेऊन जा व्यवहाराची सवय लावा.वस्तू खरेदी, विक्री , नफा, तोटा समजून सांगा.तुमचा व्यवसाय असेल तर त्यात मुलांची मदत घ्या . व्यवसायातील बारकावे,कलाकुसर मुलांना शिकवा . मुले आनंदाने  काम करतात . व्यावहारिक शिक्षण आपोआप घडेल 

छंद हे असे साधन आहे की तणाव दूर करण्यास मदत करतात आनंद निर्माण करतात मुलांना विविध छंद जोपसण्यासाठी मदत करा . बासरी, हार्मोनियम, तबला , पखवाज, ढोलकी असे वाद्य मुलांना शिकवा त्यासाठी आपल्या परिसरातील गायक, वादक यांच्याकडे तासाभराची शिकवणी लावा.सराव करा आपला दिवस आनंदी होईल मुले सुट्टीचा आनंद अनुभवतील संस्कार मुलांवर नकळत घडतील.एवढे सगळे आनंददायी उपक्रम दिवसभरात दररोज घेतले तर सुट्टी आनंददायी हसत खेळत, निरोगी ,अभ्यासयुक्त होईल कला,छंद यांची आवड निश्चितच मुलांमध्ये निर्माण होईल.

"करी मनोरंजन जो मुलांचे , जडेल नाते प्रभूशी तयाचे " संस्कारक्षम पिढी बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू या !