Wednesday 17 May 2023

माझा ब्लॉग माझे विचार - वाचनवेड

 

वाचनवेड 

"दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" असे समर्थ रामदासांनी  म्हटले होते.

वाचाल तर वाचाल. वाचनाने मन प्रगल्भ होते.परंतू सध्या मुलांचा पुस्तक वाचनाकडे ओढा कमी होत चालला आहे.क्रमिक पुस्तके सोडून विद्यार्थी इतर अवांतर वाचन जसे- गोष्टी, कविता संग्रह, आत्मकथा , कादंबरी, ऐतिहासिक पुस्तके, थोर नेते  यांच्यावर आधारित पुस्तके अशा वैविध्यपूर्ण पुस्तकांचे वाचन करतांना दिसत नाही.

वाचनाने व्यक्ती सुसंस्कारित होतो.आपल्या अवतीभोवती,परिसरात घडणा-या चांगल्या, वाईट घटना आपल्याला वर्तमानपत्रातून समजतात.वर्तमानपत्राचे दैनिक वाचन सुध्दा मुलांनी केले पाहिजे त्यातील लेखांचे वाचन , विविध विषयावरील सदरांचे बारकाईने वाचन करावे.शब्दकोडे सोडवावे.

पुस्तके वाचन मुले का करत नाही? यामागे अनेक कारणे असतील. गरीब परिस्थिती, पुस्तक विकत घेण्याची ऐपत नाही.परंतू एकमेकाच्या सहकार्यातून पुस्तक देवाणघेवाण च्या माध्यमातून  हा प्रश्न सुटू शकतो. पुस्तक प्रेमी मुलांशी मैत्री करावी.म्हणजे पुस्तके वाचनाचा मार्ग मोकळा होईल. मनात दुर्दम्य , प्रबळ इच्छा शक्ती असली तर कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होते.

मुलांचे मोबाईलवेड हे सुध्दा अवांतर वाचन न करण्यामागील कारण असू शकते आजकाल मुले मोबाईलवेडी झालेली आहेत.मोबाईलवर गेम खेळणे, यु ट्यूब व्हिडिओ , रिल पाहण्यात मुले वेळ घालवीत आहे.पालक मुलांचा हट्ट पुरवतात मुलांना महागडे मोबाईल घेऊन देतात.ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल वापरणे ठीक आहे किंवा अभ्यासासंदर्भात माहिती संदर्भ शोधणे , व्हिडिओ पाहणे अशा बाबींसाठी मोबाईल वापरण्यास हरकत कोणाचीही असणार नाही.पण मोबाईलचा इतर अनावश्यक कारणांसाठी वापर मुले करणार नाहीत याची आपण पालक म्हणून काळजी घेतली पाहिजे  व मुलांनी याबाबत समजूतदार पणा दाखविला पाहिजे जेवढा वेळ आपण मित्रमैत्रिणींबरोबर चॅटिंग करण्यात घालवतो तेवढ्या वेळात आपण एखादे पुस्तक वाचू शकतो.

दूरदर्शन (टि.व्ही) वरील मालिका, चित्रपट, गाणे मुले तासंनतास पाहत असतात घरातील पालक, ज्येष्ठ व्यक्ती सुध्दा टी.व्ही चा मनोरंजन म्हणून वापर करत असतात. हेही अवांतर पुस्तके न वाचण्याचे कारण असेल परंतू पालक म्हणून आपण काही बंधने आपल्या पाल्यासाठी पाळायला हवीत अशा मनोरंजन साधनांचा वापर कमीत कमी वापरण्याकडे लक्ष द्यायला हवे. काही चांगले  संस्कारक्षम चित्रपट,( श्यामची आई , छत्रपती शिवाजी महाराज ) ऐतिहासिक मालिका (छत्रपती संभाजीराजे) मुलांना आवर्जून दाखवा.त्यातून मुलांना नीती,मूल्ये मिळतील त्यांची आज मुलांना समाजाला गरज आहे.

पालकांनी आवर्जून पुस्तके मुलांसाठी खरेदी केली पाहिजे व आपल्या घरामध्ये छोटेसे ग्रंथालय साकारले पाहिजे पालकांनी पुस्तके वाचायला सुरूवात केली तर मुले पालकांचे निश्चितच अनुकरण करतील. व पुस्तके  वाचतील.

'आधी केले मग सांगितले'.असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे या उक्तीप्रमाणे पालकांनी स्वतःपासून वाचनाची सुरूवात केली पाहिजे.व नंतर मुलांना सांगितले पाहिजे .मुले अनुकरणप्रिय असतात आपले आई,वडील वाचन करतांना जर मुलांना दिसले तर मुलेही पुस्तक घेऊन वाचायला सुरूवात करतील. आयुष्यभर शिकण्याची आवड माणसात निर्माण झाली पाहिजे.

मुलांना वाचनाची एकदा सवय लागली की ते भराभरा पुस्तके वाचून काढतील.मुलांचा वाचनाचा वेग वाढेल. विविध पुस्तके मुले वाचतील ,वाचनाचे वेड मुलांना लागेल. मुलांमध्ये शब्दसंपत्ती वाढेल वाचलेल्या पुस्तकांचा सारांश, मतितार्थ मुले इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतील मुलांचे संभाषण कौशल्य वाढेल,कथा,कविता मुले करू लागतील. एवढेच नव्हे तर मुले पुस्तकातील टिपणे काढतील लिहीण्याची सवय मुलांना लागेल, शुध्द वळणदार हस्ताक्षर होईल.

एकदा की वाचनाचे वेड मुलांना लागले की ते थांबवायचा प्रयत्न कोणीच करू शकणार नाही.वाचनाने विचार करण्याची शक्ती वाढेल मनन, चिंतन मुले करतील इतर अनावश्यक गोष्टींपासून मुले आपोआपच दूर जातील.  घरामध्ये एक सुसंस्कारित असे वातावरण तयार होईल. पालकांनी आपल्या गावाजवळ ,शहरात कोठेही पुस्तक प्रदर्शन भरले असेल तर वेळ काढून आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी घेऊन जा त्यांना पुस्तकांचे प्रदर्शन फिरून दाखवा.चांगली पुस्तके आपल्या पाल्यांसाठी वाचनासाठी खरेदी करा. त्याचा निश्चितच फायदा होईल.तोटा होणार नाही.

 नात्यातील,मित्रांच्या मुलांच्या वाढदिवसाला जातांना इतर अनावश्यक भेट देण्यापेक्षा आवर्जून पुस्तक भेट द्या. घेणा-याला निश्चित आनंद होईल व देणा-याला पुस्तक दिल्याचे समाधान मिळेल.

"इवलेसे रोप लावियले द्वारी|

त्याचा वेलू गेला गगनावरी"||

असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणून पालकांनी आपल्या घरात एक छोटेसे ग्रंथालय उभारा त्याचा उपयोग स्वतःकरा व मुलांना सुध्दा वाचनाची गोडी लावा. आणि पहा काही दिवसांनी आपली मुले नक्कीच सुसंस्कारित होतील,समृध्द होतील.एक सुसंस्कारित,आदर्श पिढी घडविण्याचे पुण्य आपल्याला नक्की लाभेल हीच काळाची गरज आहे .

चला तर मग आपल्या पासूनच कार्याला सुरूवात करू या .....

- कैलास भागवत,  संगमनेर

No comments:

Post a Comment