Sunday 23 October 2022

माझा ब्लाॅग माझे विचार - दिवाळीचा फराळ

 

दिवाळीचा फराळ 

दिवाळी आली की सगळीकडे फराळ बनवण्याची लगबग सुरू व्हायची शेजारी सुध्दा फराळ बनवण्यास एकमेकांना मदत करायचे करंजी बनवण्याचा साचा  सगळ्या गावात फिरायचा.तसेच शेव बनवण्यासाठी सो-या दाबता दाबता जीव मेटाकुटीला यायचा तेव्हा कुठेतरी कढईत शेव दिसायची शेव लाल पिवळी झाली की प्लेटमध्ये गरम खायला मिळायची.  शंकरपाळे कडक, खुशखुशीत तयार व्हायचे चहामध्ये टाकून खायला आवडायचे.सो-या गोल गोल फिरवायचा तेव्हा चकली तयार व्हायची.  लाडू तयार करणे म्हणजे एक मोठे दिव्य होते. बेसनपीठाच्या पु-या लालबुंद झाल्या की कढईतून परातीत यायच्या मग घरातील सर्व माणसे पु-या आपल्या मजबूत हाताने कुस्कुरून बारीक करायचे गरम पु-यांचा चटका बसून हात लाल व्हायचे तरी दिवाळीचा फराळ बनविण्याचा आनंद कमी होत नव्हता. बारीक चुरा केला की त्यात साखरेचा गरम पाक ओतायचा चुरा थंड झाला की लाडू बांधण्यासाठी मेळा जमायचा कोणाचे लाडू गोल व्हायचे तर कुणाचे लंबगोल पण लगबगीने सर्व पदार्थ तयार व्हायचे.

फराळ करण्यासाठी सर्व मित्र, नातलग, गोतवळा जमा व्हायचा गप्पा मारत फराळावर ताव मारायचे गावाकडच्या, शहरातल्या गमतीजमती, मस्करी, मज्जा मस्ती व्हायची. 

मला मात्र या दिवाळीच्या फराळावर नजर फिरवतांना गंमत वाटायची लाडूकडे बघतांना मनात यायचे अरे या लाडूसारखे माणसे गोल असतात आयुष्यात दुस-यांना गोलगोल फिरवण्यात ते तरबेज असतात.लाडूसारखी गोड  भरीव माणसेही आपल्या आयुष्यात कधीतरी येऊन जातात व आपले आयुष्य गोड करतात. 

चिवड्या कडे पाहिले तर असे वाटते की आयुष्य खूप सा-या गोष्टींने भरलेले असते कधी तिखट, कधी गोड, कधी आंबट तर कधी खारट पण सर्व मिळून एकत्र एकजीव झाले की आयुष्य फुलून येते.

मला करंजी खूप आवडते वरून कडक पण आतून मऊ आयुष्यात वरून कडक पण आत मात्र मायाळू असे ज्येष्ठ मंडळीही भेटतात आपण त्यांचा रागराग करतो पण त्यांच्यात मायेचे सारण ओतप्रोत भरलेले असते. आपण त्यांच्याशी जवळीक साधली तरच  त्याची संवेदना, जाणीव आपल्याला नक्की जाणवते. चटकदार शेव कोणाला आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही.तिखट , चमचमीत शेव पाहिल्यानंतर वाटते आयुष्यात काही तिखट माणसे येतात शेवसारखी तिखट असलेली तिखट बोलून अपमान करणारी दुस-यांना टक्के टोणपे मारणारी ही माणसे मला शेवेसारखी तिखट वाटतात पण त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलेले बरे!

गोड शंकरपाळे मनापासून आवडतात कधी कडक तर कधी खुशखुशीत होतात.जीवनात कडक, नरम असे माणसे आपल्या वाट्याला येतात खूप कडक, शिस्तप्रिय असलेली जीवन जगलेली माणसे पण आयुष्याच्या शेवटी खूपच नरम झालेली असतात.त्यांच्याकडे बघितले किंवा त्याचे अनुभव ऐकले तर आयुष्यातील गोडवा नक्कीच वाढतो.  काटेदार चकलीकडे पाहिले की वाटते जीवन जगत असतांना असेच काटे रस्त्यावर येतात त्यांना दूर करून पुढे जायचे असते अशी खूप माणसे जीवनात भेटतात संघर्ष करून आयुष्य घडवतात. अशी फराळासारखी माणसे आपल्याला आयुष्यात भेटत असतात काही गोड, तिखट,खारट कडक, खुशखुशीत, नरम या सर्वांना घेऊन आपण दिवाळीचा फराळ करायचा व मस्त दिवाळी बंधूभावाने एकोप्याने साजरी करायची.हाच एकीचा संदेश
आपण दिपावलीनिमित्त देऊ या .....
   
दिपावली गरीबाची, दिपावली श्रीमंताची 
दिपावली कामगाराची,दिपावली शेतक-याची 
दिपावली आपणा सर्वांची, बंधूभावाने एकदिलाने जपायची.