माझे शैक्षणिक लेख

         


           संस्कार व शिक्षण                  

 

संस्कार काळाची गरज आहे. योग्य आचार विचार,गुण अवगुण हे ओळखण्याची क्षमता म्हणजे संस्कार. संस्कार व शिक्षण यांचा मिलाफ झाला तर सुसंस्कारित जीवन घडेल.


 शिक्षणामुळे मनुष्यास शहाणपण येते . संस्कारामुळे आयुष्याला वळण मिळते . शिक्षण घेतले म्हणजे संस्कार घडतीलच असे नाही तर संस्कार रुजवावे लागतात. संस्कार काळाची गरज आहे . संस्काराची सुरुवात घरापासून  होते, शाळा ,परिसर हे सुद्धा संस्काराचे केंद्र आहेत .  

                बालकावर संस्कार कुटुंबातील व्यक्ती करतात आजोबा,आजी हे तर जुन्या पिढीतील संस्काराचे व्यासपीठ होते . विशेषतः आजीबाई , आजीचा बटवा उघडला की त्यातून खजिना बाहेर पडत असे . त्या बटव्यात गोष्टी असत ,विनोद असत ,नकला असत , जात्यावरच्या ओव्या असत , बडबडगीते व गाणी असत  आयुर्वेद असे आजी म्हणजे शिक्षक, वैद्य , कलाकार या सर्व भूमिका शानदार उठवीत असे . आजच्या पिढीला अशा आजीची कमतरता नक्की जाणवत असेल . आईची भूमिका पण बालकाच्या जडणघडणीत खूप महत्त्वाची राहिली आहे . बालक आईजवळ असते बालकाची भाषा आईसोडून बाकीच्या लोकानां लवकर समजत नाही . आई चे स्थान बालकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असते . घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा . आपल्यापेक्षा मोठ्या भावाला दादा व बहिणीला ताई म्हणायचे . सर्वांची छोठी शक्य असणारी कामे ऐकायची .शेजारील व परिसरातील व्यक्तींचा आदर करावा असे संस्कार आई लहानपणी बालकावर रुजवत असते . वडील बाहेरील परिस्थीतिची व  गरीबीची , काटकसरीची , व्यवहाराची जाणीव प्रसंगानुरूप करून देतात . म्हणूनच  कुटुंब बालकाच्या संस्काराचा पाया आहे . 

        मुलांवर परिसरातूनही सहज संस्कार घडत असतात . परिसरातील वस्ती , गाव , संस्कृती यामधून चांगल्या , वाईट गोष्टी तो शिकतो लहान असल्याने चांगले काय वाईट काय याची जाणीव त्याला नसते . म्हणून घरातील व्यक्तींचे त्याच्यावर लक्ष हवे मुले बाहेरील घडलेली घटना कुटुंबातील व्यक्तीना सांगत असतात त्यावेळी तो जे काही सांगत आहे हे आपण लक्षपूर्वक ऐकले पाहिजे त्याकडे आपण दुर्लक्ष केले तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात . म्हणून तो जे काही सांगत आहे हे आपण ऐकून त्यावर चांगले काय , वाईट काय याचा उपदेश समजपूर्वक न रागावता समजून सांगितले तर संस्काराची पालवी फुटायला नक्कीच सुरुवात होईल .

      संस्काराचे मंदीर म्हणजे मराठी शाळा मुल आईचे बोट धरून या मंदिरात पाउल ठेवते तेंव्हा खऱ्या अर्थाने संस्कार व शिक्षण दोन्ही एकत्र सुरु होते . आता मूल विद्यार्थी झालेले असते . सरस्वतीच्या मंदिरात गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली संस्काराचा  वटवृक्ष बहरायला सुरुवात होते . शिस्त, आज्ञाधारकपणा, देशप्रेम , बंधुभाव , संवेदनशील , सभाधीटपणा या गुणांचा संगम होतो .  गुरुजनांविषयी आपुलकी आत्मीयता वाटू लागते . शिक्षणातून सहज संस्कार राबविले जातात .  परिपाठासारख्या उपक्रमातून राष्ट्रीय मुल्यांचा शिडकावा विध्यार्थ्याच्या मनावर होत असतो . गाणी ,गप्पा , गोष्टी , कविता विविध राष्ट्रपुरुषांची जयंती , थोरांचे बोल , राष्ट्रीय सण , विविध शालेय उपक्रम , खेळ , कार्यानुभव , चित्रकला या सर्वांचा परिपाक होऊन  संस्काराची मुळे घट्ट रोवतात . मुले शाळेतील घटना , प्रसंग गुरुजींनी काय शिकवले अभ्यास कोणता दिला सर्व काही पालकांना सांगत असते . दिवसभराचा वृतांत कथन करतो. अशा वेळी आपण मुलांसाठी वेळ दिला पाहिजे मुले काय सांगते ते ऐकून घेतले पाहिजे . शिक्षकांविषयी आदराची भावना मुलाच्या मनात कशी निर्माण होईल यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न करायला हवा मुलाची  प्रगती , वागणुक याविषयी गुरुजनाची भेट घेऊन जाणून घेतले पाहिजे .  

    संस्कार आज काळाची गरज आहे . बालपणी जिजामातेने  संस्काराची बीजे रुजल्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराज घडले. रयतेचे स्वराज्य निर्माण झाले.  श्यामच्या आईने श्यामवर उत्तम संस्कार केले . मुल्यांची पाखरण श्यामवर केली म्हणून महाराष्ट्राला संवेदनशील मनाचे साने गुरुजी मिळाले . श्यामच्या आईने श्यामवर केलेले संस्कार गोष्टीरूपात आदर्श शिक्षक साने गुरुजींनी विध्यार्थ्यापर्यंत पोहचवण्याचे कार्य केले .

 पालकांना संस्काराची जी शिदोरी आपल्या वाडवडीलांकडून मिळाली ती शिदोरी सोडण्याची वेळ आली आहे . आपण पालक म्हणून वडीलधा-यांचा , गुरुजनांचा आदर सन्मान केला तर मुले तुमचे अनुकरण करतील. ते सुद्धा विनयशील होतील व वडीलधा-यांचा , गुरुजनांचा आदर सन्मान करतील . त्यासाठी संस्काराचा शोध घेण्याची गरज पडणार नाही . संस्काराचे क्लास लावून मिळणाऱ्या विकतच्या संस्कारापेक्षा रोजच्या वागणुकीतून मिळणारी कुटुंबातील, व्यवहारातील, शिकवणूक आचार विचार ,गुण अवगुण हे ओळखता आले तरी मुलांवर संस्कार घडले असे म्हणता येईल .

मुलांच्या संस्कारासाठी पालकांनी एवढे करा .

१ ) घरात ग्रंथालय तयार करा . पुस्तकांचे वाचन करा.

२ ) स्वतः ची कामे स्वतः करा .

३ ) संस्कारक्षम चित्रपट , गाणी मुलांना दाखवा .

४ ) परवचा , हनुमान चालीसा , मनाचे श्लोक यांचे दैनंदिन पारायण करा . 

५ ) मुलांना सुट्टीच्या दिवशी तुमच्या व्यवसायामधील छोटी मोठी कामे करण्याची सवय लावा  व्यावहारिक , कृतीतून सहज शिक्षण द्या 

६ ) व्याख्यान , प्रवचन मुलांना ऐकवा .                                         ७ ) मुले बरोबर असतांना नेहमी खरे बोला .

८ ) दररोज हातपाय धुवून देवाचा दिवा लावा , सायंप्रार्थना /  आरती म्हणा . 

९ ) दूरदर्शनवरील चांगले कार्यक्रम पहा व वापर मर्यादित ठेवा .

१०) मोबाईलचा वापर गरजेपुरता करा .

पालकांनी स्वतःपासून वरीलप्रमाणे उपक्रमांची सुरुवात केली तर मुले त्यांचे अनुकरण करतील व संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम ख-या अर्थाने सुरु होईल .


श्री. कैलास कुंडलीक भागवत (प्राथ.शिक्षक )

                      जि.प.प्राथ.शाळा आंबीखालसा ता.संगमनेर  

                      जि. अ.नगर  



वाढदिवसाची भेट

परिपाठ संपला विद्यार्थी वर्गात आले. हजेरी घेतली.  मुलींनी एकच गलका केला सर आज दिव्या चा वाढदिवस आहे. अरे वा ! दिव्याला जवळ बोलावले खरच तुझा वाढदिवस आहे. दिव्या  हो म्हणाली वाढदिवसाला मुलांना  वाटण्यासाठी पप्पा चाॅकलेट देणार आहेत दिव्याने आनंदाने सांगितले . दिव्या वडील चाॅकलेट चा पुडा आणतील म्हणून चातकासारखी वाट पहात होती पण बराच वेळ झाला वडील आले नाही दिव्या नाखुश झाली 

शाळेत वाढदिवसानिमित्त  मुले चाॅकलेट, बिस्कीट वाटतात आज मला चाॅकलेट वाटायचे आहेत असे दिव्याला मनोमन वाटत असावे तिच्या अंतरीची भावना जाणली.  दिव्याला जवळ बोलावले विद्यार्थ्याना सांगितले आज दिव्याचा वाढदिवस आहे आपण सर्वजण तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ या ! सर्व मुलांनी दिव्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या  जवळच्या जनरल स्टोअर्स मध्ये गेलो, दिव्याला वही व चाॅकलेट चा पुडा घेतला वाढदिवसानिमित्त वही भेट दिली , व हातात चाॅकलेट चा पुडा ठेवला. दिव्याला खूपच आनंद झाला. चेहऱ्यावर हास्य फुलले दिव्याला म्हटले जा दिव्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना चाॅकलेट वाटप कर  दिव्या हसली सर्व मुलांना चाॅकलेट वाटू लागली. दिव्याच्या निरागस चेहऱ्यावरील हास्य, आनंद मनाला खूपच सुखावून गेला.  वाढदिवसाच्या दिवशी शाळेतील आपल्या मित्रमैत्रिणींना खाऊ देण्यामागे जी दातृत्वाची भावना मुलांची असते ती खरोखरच वाखण्याजोगी असते आपण समाजाचे देणे लागतो ही दानशूरपणाची भावना मुलांमध्ये असते.  हीच भावना मला दिव्यात दिसली.सुख वाटून घेतले म्हणजे शिक्षणातून जगण सुकर होतं असेच  दातृत्वाचे संस्कार मराठी शाळेत मुलांवर नकळत बिंबवले व रूजवले जातात. हाच खरा मुल्यसंस्काराचा ठेवा !



                                                                                                                                         कैलास भागवत (प्राथमिक शिक्षक)

                                                           जि.प.प्राथ.शाळा आंबीखालसा

                                                           ता.संगमनेर जि.अ.नगर

No comments:

Post a Comment