Monday 12 June 2023

माझा ब्लॉग माझे विचार - शाळेतील पहिले पाऊल





                                          शाळेतील पहिले पाऊल 


मुलांची पहिली शिक्षिका 'आई ' असते.आई व मुलाचे नाते नाजूक असते.स्वतःला विसरून मुलांना घडविणारी आई असते.मूलाच्या जन्मापासून आई मुलाला घडवित असते. 

तसेच घरातील वडील,आजी ,आजोबा यांचेही संस्कार मुलांवर होत असतात.हसणं,रडण,

रागावणं,रुसणे अशा चेह-यावरील हावभावातून मूल व्यक्त होत असते.हळूहळू आई, बाबा अशा नावाने ते हाका मारते नंतर इतर शब्द ऐकून बोलण्याचा मूल प्रयत्न करते.परिसरातूनही मूल शिकत असते.परिसरातून विविध शब्द त्याच्या कानावर पडत असतात त्या शब्दांचे उच्चार बालक करीत असते.घर,परिसरातील बोलली जाणारी बोलीभाषा ते शिकत असते.बोलण्याचा प्रयत्न करते.बालकाचे पालनपोषण,आहार याची काळजी आई करत असते.बाळाला काय आवडते, काय नावडते हे आई बघते. त्याप्रमाणे त्याला भरवण्याचा प्रयत्न करते.

 पूर्वप्राथमिक शाळा अर्थात अंगणवाडीत आईच्या पदराला धरून बालक जाते.तेथे खेळते,बागडते.गाणी ,गोष्टी ऐकते.जसजसे बालकाचे वय वाढत जाते.तसे ते चालते,बोलते स्वतः काम करण्याचा प्रयत्न करते.शाळेत जाण्याच्या वयाचे ते होते. बालकाचे सहा वर्ष पूर्ण झालेले असतात.मूलाचे पाल्य मुलांना कोणत्या शाळेत पाठवायचे,शाळा कशी आहे.शिक्षक कोणते आहेत. याविषयी शेजारीपाजारी,परिसरात,

नातलगात,गावात मित्रमंडळींबरोबर चर्चा करतात.आपल्या मुलाचे भविष्य उज्वल घडवावे ही त्यांची भावना असते.

प्राथमिक शाळेत मुलाचे पहिले पाऊल पडणार असते.केवढा आनंद आईला व घरादाराला झालेला असतो. शाळेविषयी मनात कुतूहल असते.आपल्या गावातील मराठी शाळा,"आपला अभिमान मराठी शाळा "ज्या शाळेत आपण शिकलो त्याच शाळेत आपले मुले शिकणार याचा मनस्वी आनंद पालकांना झालेला असतो.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

'आई' नंतर मूलांचा गुरू अर्थात 'शिक्षक 'असतो.शिक्षक चांगल्या राष्ट्राचा आदर्श निर्माता असतो.मातीच्या गोळ्याला  आकार देण्याचे काम जसा 'कुंभार 'मेहनतीने आपल्या कल्पक हाताने करतो.व छानसे मडके तयार करतो.अगदी त्याप्रमाणे शिक्षक मुलांना घडविण्याचे त्यांना संस्कारीत करण्याचे काम करतात.

सुट्टीनंतर शाळा सुरू होत आहेत.तोपर्यंत आपल्या मुलांना शाळेची सवय लागावी मुले शाळेत नवीन प्रवेशित होणार आहेत. नवीन शिक्षक,नवीन मित्र मुलांना मिळतील शाळेचे वेळापत्रक, जेवणाच्या वेळा याची सवय आतापासूनच पालकांनी मुलांना लावावी.तसेच आपली शाळा कशी असेल छान खेळण्यासाठी मैदान असेल का ? गाणे ,गप्पा , गोष्टी होतील का ? नाचायला,गाणे गायला  मिळेल का?अशी  उत्सुकता मुलांना असेल त्यासाठी पालकांनी मुलाला गावात जाऊन शाळा दाखवण्यास हरकत नाही.

लहान मुले हट्टी असतात मला हे पाहिजे ते नको असा घोषा लावतात जे योग्य असेल ते दिले पाहिजे परंतू एखादी वस्तू,पदार्थ नको हे सुध्दा त्यांच्या मनावर  बिंबवले पाहिजे मुलांना त्या वस्तूचे,पदार्थाचे फायदे,तोटे समजावून सांगणे गरजेचे असते.मुलांना नकार पचवता आला पाहिजे.

 "आरोग्य सुदृढ तर मन सुदृढ" मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाचा,पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे.तरच त्यांचे लक्ष  अभ्यासाकडे लागेल.

मुलांना जेवणाच्या डब्यात काय द्यावे हा विचार आईच्या  मनात येत असेल.हल्ली मुलांना बाहेरील खाऊ जास्त आवडतो.कुरकुरे,वेफर्स वडापाव, हे पदार्थ मुलांच्या डब्यात देऊ नका मुलांना पौष्टिक पदार्थ बनवून द्या.सुका मेवा व चपाती भाजी यांचा समावेश डब्यात करावा.घरी बनवलेला चुरमुरे चिवडा,खजूराचे लाडू , फुटाणे,गूळ शेंगदाणे,मनुके , नाचणीचे बिस्कीटे यापैकी दररोज कोणत्याही एकाचा पौष्टिक आहार म्हणून समावेश करावा.म्हणजे मुले बाहेरील पदार्थ खाणार नाहीत.पालेभाज्या, कडधान्ये,ज्वारीची भाकरी किंवा चपाती यांचा समावेश दुपारच्या जेवणात असावा.शाळेतील पूरक आहाराचा सुध्दा लाभ घ्यावा. आतापासूनच घरी मुलांना शाळेतील वेळापत्रका प्रमाणे सवय लावावी.लवकर उठणे, वेळेवर आवरणे ,जेवण करणे , वेळेत अभ्यास करणे , खेळणे , लवकर झोपणे असे नियोजन आताच करा.  शेजारील मुलांशी मैत्री करणे त्यांच्याकडून शाळेविषयी, शिक्षकांविषयी जाणून घेणे.हे सुध्दा खूप महत्वाचे असते.  

शाळेतील पहिल्या दिवशी शाळेसाठी आपल्या पाल्यासाठी वेळ द्या. शिक्षकांशी , वर्गशिक्षकाशी मुलामुलीं विषयी बोला.त्यांचे गुण , छंद , आवड सांगा.

शाळेतील पहिला दिवस नक्कीच आनंदात जाणार शाळेतील पहिले पाऊल सकारात्मक, आनंदी,उत्साही नक्की पडेल . शिक्षणाचा श्रीगणेशा होईल.

- कैलास भागवत, संगमनेर 9011227586

1 comment: