Saturday 8 April 2023

माझा ब्लॉग माझे विचार - शिक्षक ज्ञानाचा झरा

 

शिक्षक ज्ञानाचा झरा 


गुरूजी एक नाव होते

विद्यार्थ्याचे दैवत होते.

गोरगरीबांचे कैवारी होते.

गावासाठी झगडणारे संत होते.


शिक्षक मूर्तीमंत अखंड वाहणारा ज्ञानाचा झरा असतो. कुंभार जसा मातीचा चिखल तयार करून तुडवतो, एकजीव करतो व त्याला हवा तसा आकार देतो.तसे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यासाठी आपली सर्व कौशल्ये पणाला लावतात.विद्यार्थ्यांमध्ये दडलेले,लपलेले सुप्त गुण अचूक ओळखतात व त्या गुणांना वाव मिळवण्यासाठी प्रयत्न करतात .जातीभेद,  गरीब,श्रीमंत शिक्षकांच्या ठिकाणी नसतोच मुळी माझा विद्यार्थी घडला पाहिजे , शिकला पाहिजे.हाच आशावाद ते बाळगून असतात . पूर्वीच्या काळी गुरूजींचा धाक विद्यार्थ्यांवर होता पालक आजही म्हणतात " गुरुजी रस्त्याने चालले की मुले खेळत असतील तर गुरूजींना पाहून पळून जायचे." गुरुजींचा धाक व कडक शिस्त यांची दहशत मुलांवर होती त्यास पालकांचा पाठिंबा होता.गुरूजींना गावात आदर होता. गावातील कोणताही कार्यक्रम गुरुजींशिवाय पार पडत नसे. गावातील सप्ताह,  पारायण,लग्न गुरुजींच्या पुढाकाराने होत. गावात कोणाच्या घरी पत्र आले की बायाबापडे ते वाचण्यासाठी गुरूजींच्या घरी जात .

सुख दुःखाचे प्रसंगात गुरूजी सामील होत.गावातील भांडणतंटे गुरूजी सोडवत असत. गुरूजी नावात भीतीयुक्त दरारा आत्मीयता, प्रेम , जिव्हाळा,आपुलकी होती. कोणतीही शैक्षणिक साधने नसतांना मुले अभ्यासात हुशार होती.पाढे पाठ होते वाचन , लेखनात प्रगत होती.अक्षर वळणदार होते.मूल्यसंस्काराचा ठेवा कळत नकळत घडत होता.प्रत्येक मुलांचे प्रगतिपुस्तक गुरूजींच्या डोक्यात होते.शाळेतील कोणता मुलगा हुशार,कोण खोडकर , कोण मठ्ठ,  कोण चतुर, कोण कलाकार गुरूजींना मुलांचे गुण , अवगुण ज्ञात होते.कोणाला पास करायचे, कोणाला नापास करायचे हे त्यांना ठाऊक होते.मुलांची शिक्षणकुंडलीच पालकांसमोर मांडली जायची. मागच्या वर्गात जरी विद्यार्थी राहिला तरी तावूनसुलाखून तो बाहेर पडत असे. पालकांचा गुरूजींना जाहीर पाठींबाच असायचा. "गुरूजी काय म्हणतो आमचा बाळ्या" अभ्यासात कसा काय ?नाहीतर ठेवा त्याला याच वर्गात " पालक सहज हसत म्हणायचे गुरूजींवर किती विश्वास होता.

गुरूजी शाळेचे, गावाचे चालतेबोलते व्यासपीठ होते.कुटुंबप्रमुख होते.आपल्या कुटुंबाची काळजी गुरूजींनी कधी केली नाही पण शाळेसाठी , गावासाठी गुरूजी राबले.


दिवसामागून दिवस गेले परिस्थिती बदलली. वाहतुकीची साधने गावात आली.गावातील माणसे बदलली.शाळेचे रूपडे पालटले शर्ट धोतर , पायजमा सद-यातील गुरूजी कालबाह्य झाले.

गावात बस आली.बसमधून शर्ट,पँट, बूट पेहराव असलेली व्यक्ती उतरली. ज्येष्ठ माणसाजवळ येऊन थांबले.व विचारू लागले

"बाबा शाळा कुठे आहे. " बाबांनी समोरच उभ्या असलेल्या इमारतीकडे बोट दाखविले व म्हणाले " ती बघा समोरच इमारत दिसते ती शाळा " शाळेसमोर ती व्यक्ती येताच त्यांनी  शाळेची नवीन इमारत तिचे पालटले रूप, जुनी कौल, पत्रा ,दगडी इमारत जाऊन त्या जागेवर शाळेची रंगीत,चित्रमय इमारत बघून सर थक्क झाले. 

मुलांनी एकच गलका केला. सर स्वप्नातून बाहेर आले ते मुलांच्या गोंगाटाने 

 "नवीन 'सर' आले".

गुरूजींची जागा सरांनी घेतली होती. मला तर वाटते 'गुरूजी ' शब्दात जो ओलावा, जिव्हाळा, प्रेम होते.ते कदाचित सर या शब्दात जाणवले नाही. 'सर' या शब्दात जरी ते जाणवले नसेल पण ' सर 'ही व्यक्ती अफाट होती.आधुनिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम निश्चितच गुरूजींनी सुरू केले असेल."गुरूजींनी शिक्षणाचा पाया रचला, तर सरांनी त्यावर कळस चढविला." 

शाळेचे रंग रूप पालटले होते .शाळेच्या आतील , बाहेरील भिंती सजल्या होत्या.शाळेत टी.व्ही आला.बातम्या , बालचित्रवाणी कार्यक्रम मुलांना सर दाखवू लागले त्यानंतर 

 काॅमप्युटर आले सरांना हे सर्व नवीन होते.काॅमप्युटर कीबोर्ड वर बोटे फिरली मुले नवलाईने बघू लागली. गाणी , गोष्टी , संस्कारक्षम बालचित्रपट मुलांना पाहायला मिळू लागले. सरांनी काठी दूर कोप-यात ठेवली. मुले सरांच्या जवळ आले सर मुलांशी एकरूप झाले.गाणी , गप्पा रंगल्या व येथेच आनंददायी शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू केला.लाजरी,बुजरी मुले शाळेत येऊ लागली. बोलू लागली.शिक्षण घेऊ लागली. सर गावात दिसले की सरांच्या जवळ येऊ लागली. सरांना बाय बाय , टाटा करू लागली.सर व मुलांचा दुरावा कमी झाला. स्पर्धा परिक्षेत चमकू लागली.सरांचे नाव गावात झाले.गाव शाळेत आले.शाळा गावात गेली.शाळेत विविध समित्या स्थापन झाल्या. सरकारी तांदूळ मुलांना शाळेत पिशवीतून मिळू लागला. शाळेत रेशन दुकान सुरू झाले.सर तांदळाच्या पिशव्या मुलांना रांगेत वाटू लागले. वाटपाच्या नोंदी रजिस्टर वर ठेवू लागले अधिकारी,ग्रामस्थ यांच्या शाळेकडे भेटी वाढल्या.

 शाळेत जेवणाच्या दररोज पंगती उठू लागल्या शालेय षोषण आहार शिजवण्यासाठी भाजीपाला खरेदी सर करू लागले.तेल , मीठ , तिखट मसाला यांच्या नोंदी घेऊ लागले.तांदळाचे पोती वाहू लागले.  आनंदी शिक्षणाची हेळसांड सुरू झाली.सर अहवाल लिहिण्यात व ते पोहोच करण्यात व्यस्त झाले.शौचालय, प्राण्यांचे  सर्वेक्षण करू लागले

तरी सुध्दा शिक्षणांची उपेक्षा सरांनी होऊ दिली नाही .वेळ काढून, जादा तास घेऊन मुले हुशार केली , सर्वगुणसंपन्न केली प्रत्येक क्षेत्रात मुले तालुक्यात, जिल्ह्य़ात चमकवली.  भाषण , नाटक , नृत्य,  मैदानी खेळ हे सर्व सर घेत होते. पाचवा वेतन आयोग आला सरांचा पगार भरघोस वाढला.गावात राहणारे' सर' शहरात गेले.सायकलवर फिरणारे सर आता चक्क नवीन मोटारसायकल वर शाळेत येऊ लागले.गाव व शिक्षक यांच्यातील जवळीक कमी झाली गावातील कार्यक्रमातील सरांचा राबता  कमी झाला.गावात पुढारी कार्यकर्ते, पक्ष संघटना वाढीस लागल्या जुने कार्यकर्ते व तरुण कार्यकर्ते यांचा मेळ बसेना गावात कुरघुडी, राजकारण सुरू झाले.त्याचा फटका शाळेला बसला.सरांवर गाव लक्ष ठेवू लागले गावचे राजकारण शाळेत आले.अमूक शिक्षक चांगला तमूक, शिक्षक वाईट, शाळेतील तक्रारी तालुक्याला गेल्या सरांच्या तक्रारी बदल्या होऊ लागल्या . सरांचे राहणीमान, 

चारचाकी गाडीत सुटाबुटात येणारे सर गावातील लोकांना खूपू लागले सरांविषयी आपुलकी , प्रेम , जिव्हाळा कमी झाला. काही ग्रामस्थ याला अपवाद होते सरांविषयी अजूनही प्रेम आपुलकी तसूभरही कमी झाली नव्हती.आपला मुलगा उच्चशिक्षित होऊन नोकरीला लागला यामागे गुरूजींची , सरांची मेहनत होती हे ते विसरले नव्हते.

दिवसामागून दिवस गेले.आनंददायी शिक्षण हायटेक झाले. संगणक लॅब , वाचनालय, प्रयोगशाळा,सुसज्ज इमारत, भौतिक सुविधां , रंगरंगोटीनी शाळा सजल्या , लोकवर्गणीतून शाळेत सुविधा वाढल्या सरकारी शाळांतील मुले इंग्रजी लिहू वाचू लागली,संभाषण करू लागली . स्कॉलरशिप,  नवोदय परिक्षेत यशस्वी झाली . इंग्रजी माध्यमातील मुलांचा ओढा पुन्हा गावातील सरकारी मराठी माध्यमांच्या शाळांकडे वाढला. 

 कार्यकर्ते,  पुढाऱ्यांचे वाढदिवसानिमित्त , माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला भरघोस मदत मिळू लागली.पालक , ग्रामस्थ  यांच्या सरांकडून शिक्षणाविषयी अपेक्षा वाढल्या. फक्त ज्ञानदानाचे कार्य शिक्षक करत असतांना शाळाबाह्य, अशैक्षणिक कामे, यात आमचा शिक्षक गुरफटून न जावो. याची काळजी समाज , सरकार यांना घ्यावी लागेल नाहीतर गरिबांच्या सरकारी शाळांचे खाजगीकरण होण्यास वेळ लागणार नाही. 

 सर जीव ओतून आपले ज्ञानदानाचे काम करत आहेत .स्पर्धा वाढली तसे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा यासाठी सर्व शिक्षक राबत आहेत . ज्ञानाचा कुंभ कधीच रीता झालेला नाही. विविध अध्यापनाचे कौशल्ये सरांनी आत्मसात केली.मूल्यसंवर्धनाची बीजे रोवली कला, कौशल्य आनंद दायी,ज्ञानरचनावादी , संगणक शिक्षण,  प्रयोगशील, कृतीशील शिक्षणाची गंगा अविरत वाहती झाली.गुरू शिष्याचे नाते आणखी घट्ट झाले. पालक, शिक्षक, समाज एकत्र आला तर शाळेची प्रगती होऊ शकते हे सर्वांनी अनुभवले.अखंड ज्ञानाचा झरा वाहता झाला कधीही न थांबणारा !

No comments:

Post a Comment